साताऱ्याची कन्या सुदेष्णाची ऐतिहासिक कामगिरी
सातारा / प्रतिनिधी : रांची (झारखंड) येथे सुरू असलेल्या ६४ व्या राष्ट्रीय खुल्या स्पर्धेत साताऱ्याची धावपटू सुदेष्णा हिने उत्कृष्ट कामगिरी करीत रौप्य पदक पटकावले. देशभरातील नामवंत खेळाडूंमध्ये झुंज देताना तिने १०० मीटर धावण्याच्या प्रकारात अवघ्या ११.६४ सेकंदात स्पर्धा पूर्ण केली. ही तिची आजवरची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
या यशामुळे सुदेष्णाने केवळ सातारा जिल्हा व महाराष्ट्र राज्याचे नाव उज्ज्वल केले नाही तर देशपातळीवरील आपले ६३ वे पदक मिळवत नवे शिखर गाठले आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेतूनच येत्या सप्टेंबर २०२६ मध्ये जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड झाली असून त्यात सुदेष्णाची निवड झाल्याची अभिमानास्पद नोंद झाली आहे.
सुदेष्णाच्या यशामागे तिचे गुरु व माजी तालुका क्रीडाधिकारी श्री. बळवंत बाबर सर यांचे अथक मार्गदर्शन व प्रशिक्षण आहे. २०१८ पासून बाबर सरांच्या मार्गदर्शनाखाली ती कठोर मेहनत घेत असून त्याचे फलित म्हणजेच हे ऐतिहासिक यश. सुदेष्णाच्या या पराक्रमाने साताऱ्यासह संपूर्ण महाराष्ट्र अभिमानाने उंचावला आहे.













