Thu, Jan 15, 2026
शिक्षण

वाई येथील GYDC मधील १३ उमेदवारांना रोजगार संधी : सीएनसी मशीन ऑपरेटर कोर्सचा यशस्वी उपक्रम

वाई येथील GYDC मधील १३ उमेदवारांना रोजगार संधी : सीएनसी मशीन ऑपरेटर कोर्सचा यशस्वी उपक्रम
Ashok Ithape
  • PublishedSeptember 11, 2025

वाई, दि. १० : ग्रामीण युवकांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गरवारे युवा विकास केंद्र (GYDC), वाई येथे राबविण्यात येणाऱ्या कौशल्य विकास उपक्रमाला मोठे यश मिळाले आहे. सीएनसी मशीन ऑपरेटर कोर्स अंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या २० उमेदवारांपैकी तब्बल १३ जणांची नामांकित कंपन्यांमध्ये यशस्वी निवड झाली असून, यामुळे वाई तालुक्यातील तरुणाईसाठी रोजगाराचे नवीन दार खुले झाले आहे.

या उमेदवारांपैकी १२ जणांची निवड हाय-टेक इंजिनियर्स लि. या प्रस्थापित कंपनीत झाली आहे, तर १ उमेदवाराची निवड आकार एंटरप्रायझेस या कंपनीत झाली आहे. ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार प्रशिक्षण, उद्योगांची गरज ओळखून प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव व रोजगार मिळवून देणे हा या कोर्सचा प्रमुख हेतू असून, यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे.

हा उपक्रम गरवारे टेक्निकल फायबर्स लि. या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) च्या माध्यमातुन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सेवा सहयोग फाऊंडेशन या संस्थेने या प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी केली. स्थानिक युवकांना उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार मिळवून देण्यात या दोन संस्थांचे मोलाचे योगदान आहे.

सीएनसी मशीन ऑपरेटर कोर्समध्ये उमेदवारांना आधुनिक यंत्रसामग्रीवरील प्रत्यक्ष प्रशिक्षण, कामकाजातील शिस्त, सुरक्षेचे नियम, गुणवत्तावाढ व उत्पादनक्षमता याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या उमेदवारांची विविध कंपन्यांमध्ये मुलाखती घेण्यात आल्या. त्यात १३ जणांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर निवड मिळवली.

यामुळे केवळ उमेदवारांनाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांनाही दिलासा मिळाला असून, ग्रामीण भागातील युवकांसाठी स्वावलंबनाचा मार्ग मोकळा झाला आहे. या यशाबद्दल निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीचे प्रेसिडेंट विवेक कुलकर्णी, व्हाईस प्रेसिडेंट अरविंद कुलकर्णी, जनरल मॅनेजर युवराज थाेरात तसेच सेवा सहयोग फाऊंडेशनच्या सर्व पदाधिकार्‍यांनी अभिनंदन करण्यात आले आहे.

“ग्रामीण युवकांना योग्य प्रशिक्षण दिल्यास ते सक्षमपणे उद्योगविश्वात आपले स्थान निर्माण करू शकतात, याचे हे यश हे उत्तम उदाहरण आहे. पुढील काळातही अशा अनेक कौशल्य विकास उपक्रमांद्वारे अधिकाधिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू राहील,” असे गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीचे प्रेसिडेंट विवेक कुलकर्णी यांनी सांगितले.

वाई तालुक्यातील युवकांना उद्योगक्षेत्रात प्रवेश मिळवून देणारा हा उपक्रम खऱ्या अर्थाने शाश्वत उपजीविकेच्या निर्मितीचा मार्ग दाखवणारा ठरला आहे.

फाेटाे ओळी : राेजगाराची संधी उपलब्ध झालेले सीएनसी मशीन ऑपरेटर्स

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!