Thu, Jan 15, 2026
अध्यात्म

भुईंज येथे गुरूवारी होणार भव्य ऋषीपंचमी सोहळा

भुईंज येथे गुरूवारी होणार भव्य ऋषीपंचमी सोहळा
Ashok Ithape
  • PublishedAugust 28, 2025

कृष्णातिरी होणार महिलांची व्रतवैकल्याची स्नान पर्वणी

भुईंज : भुईज येथे गुरूवार दि. २८ ऑगस्ट २०२५ रोजी कृष्णातिरी भव्य ऋषीपंचमी उत्सव सोहळा आणि स्नान पर्वणी सोहळा साजरा होणार राज्यभरातील महिला भाविक भुईंज येथे आचार्य भृगूऋषी आश्रमात दाखल होणार.

हिंदू धर्मातील सर्वश्रेष्ठ ऋषी आचार्य भृगूमहर्षी यांच्या जिवंत समाधी स्थळाच्या आश्रमात आणि संथ वाहणा-या कृष्णा नदीच्या काठावर महिलांचा ऋषीपंचमी हा व्रतवैकल्याचा सोहळा सदगुरू टेंबे स्वामी यांच्या अधिपत्याखाली पारंपारिक व धार्मिक विधीने संपन्न होणार असल्याची माहिती आचार्य भृगुऋषी आश्रम दत्त सेवकरी मंडळ, ज्ञानेश्वरी पारायण मंडळ, सद्‌गुरू आण्णांच्या लेकी व महिला सेवेकरी मंडळ यांनी दिलेली आहे. महिलांच्या स्नान पर्वणी सोहळयासाठी भुईज येथील कृष्णानदीच्या काठावर व बांधिव प्राचीन घाटावर महिलांसाठी विशेष सुविधा करण्यात आलेली आहे.

पुरातन काळापासून गणेश चतुर्थीच्या दुस-या दिवशी ऋषीपंचमी हा महिलांचा उपवासाचा व्रतवैकल्याचा सोहळा येत असतो. श्री क्षेत्र नारायणपूर येथील विश्व चैतन्य प. पू. श्री. सदगुरू नारायणमहाराज उर्फ आण्णा यांनी जिर्णोद्धारीत केलेल्या या आश्रमात दरवर्षी प्रमाणे यंदाही हा सोहळा साजरा होणार आहे. यावेळी सदगुरू आण्णा महाराज यांचे सतशिष्य व प्रसिद्ध भारूड सम्राट लक्ष्मण राजगुरू महाराज यांचे प्रवचन होणार असून यावेळी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कृष्णा नदीतील स्नान पर्वणी, अभिषेक, होमहवन, प्रवचन, दर्शन, सामुदायिक आरती च महाप्रसाद म्हणून महिलांसाठी फराळाचे वाटप होत असते. यासाठी थी क्षेत्र नारायणपूर शिष्य परिवार व भुईज ग्रामस्थ विशेष परिश्रम घेत असतात.

यंदाच्या सोहळयाची तयारी पुर्ण झालेली असुन राज्यभरातून येणा-या महिलांसाठी कृष्णा नदीच्या घाटावर विशेष नियोजन केलेले आहे. तर आचार्य भृगूमहर्षीच्या समाधी स्थळावर व उत्सव मुर्तींचे दर्शन घेण्यासाठी खास सोय करण्यात आलेली आहे तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री क्षेत्र नारायणपूर शिष्य परिवार, दत्त सेवेकरी मंडळ आचार्य भृगूऋषी आश्रम, ज्ञानेश्वरी पारायण मंडळ, सदगुरू आण्णांच्या लेकी, श्री महालक्ष्मी देव व इतर देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत भुईज व भुईज ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आलेले आहे.

भुईंज कृष्णानदीच्या घाटावर महिलांसाठी खास व्यवस्था, सुरक्षा यंत्रणा, वैद्यकिय सुविधा तसेच महाप्रसाद व उपवासाचे फराळ वाटप यांचे महिला सेवेकरी व दत्त सेवेकरी यांच्या सहभागातून योग्य नियोजन केले असून सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन भुईज ग्रामस्थांनी केले आहे.

भुईंज पोलीस स्टेशनच्यावतीने येणा-या महिलांसाठी विशेष सुविधा पथक व हेल्पलाईन सुरू केली असल्याची माहिती भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि रमेश गर्जे यांनी माहिती दिली महिला स्वयंसेवक यांचे वेगळे पथक नदीपात्रात सज्ज ठेवण्यात येणार आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!