Thu, Jan 15, 2026
अध्यात्म

नानक साई फाऊंडेशन ची ११ वी संत नामदेव घुमान यात्रा ऑक्टोबर महिन्यात पंजाब – दिल्ली -शिमला दौऱ्यावर जाणार

नानक साई फाऊंडेशन ची ११ वी संत नामदेव घुमान यात्रा ऑक्टोबर महिन्यात पंजाब – दिल्ली -शिमला दौऱ्यावर जाणार
Ashok Ithape
  • PublishedAugust 21, 2025

भुईंज । महेंद्रआबा जाधव : महाराष्ट्रातील भाविकांना अध्यात्म, पर्यटन, इतिहास आणि संस्कृतीचा अद्वितीय अनुभव देणारी यावर्षीची नांदेड ते अमृतसर ११ वी संत नामदेव घुमान यात्रा ऑक्टोबर महिन्यात पंजाब दिल्ली शिमला दौऱ्यावर जाणार आहे.
नानक साई फाऊंडेशनचे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी नियमितपणे ही यात्रा मोठ्या उत्साहात पार पडते. आतापर्यंत दहा यात्रा यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या असून, यंदाची यात्रा अकरावी आहे.

🔹 प्रमुख वैशिष्ट्ये
संत नामदेव महाराजांच्या पवित्र कर्मभूमी घुमान (पंजाब) येथे नतमस्तक होणे. सुवर्ण मंदिर, अमृतसर येथे दर्शन व वाघा बॉर्डरवर राष्ट्रभक्तीचा थरारक अनुभव. दिल्ली, शिमला, चंदिगड, भटिंडा, आनंदपूर साहिब, फतेहगड साहिब, जालियनवाला बाग या महत्त्वाच्या स्थळांना भेट. रामतीर्थ (लव–कुश जन्मस्थळ), वाल्मिकी आश्रम, भद्रकाली माता मंदिर, कार्तिक स्वामी मंदिर, नैना देवी शक्तीपीठ, भाक्रा नांगल धरण, पानिपत, कुरुक्षेत्र आदी ठिकाणांचा यात्रेत समावेश आहे. पंजाबच्या पर्जिया कलान गावातील मुक्काम – तेथील संस्कृती व पाहुणचार जवळून अनुभवण्याची संधी यात्रेच्या माध्यमातून मिळणार आहे.श्रद्धा, संस्कृती आणि आनंदाचा संगम हि घुमान यात्रेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. पंजाब चे मुखयमंत्री सरदार भगवंतसिंघ मान यांच्या वतीने त्यांच्या मातोश्री श्रीमती हरपाल कौर मान यावर्षी घुमान यात्रे चे संगरुर येथे स्वागत करणार आहेत.
घुमान सद्भावना यात्रा ही केवळ धार्मिक दर्शनापुरती मर्यादित यात्रा नसून भक्ती, इतिहास, कला, संस्कृती व मनोरंजन यांचा संगम घडवून आणते. परिवारासह पर्यटनासाठी योग्य अशी ही कौटुंबिक सहल दरवर्षी शेकडो भाविकांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरते. प्रत्येक टप्प्यावर पंजाब सरकार, विविध सामाजिक संस्था आणि संत मंडळींच्या वतीने यात्रेचे उत्साहाने स्वागत केले जाते. त्यामुळे यात्रेच्या दरम्यान भाविकांना पंजाबच्या मेहमाननवाजीचा आणि सांस्कृतिक परंपरेचा थेट अनुभव मिळतो.

दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील सुमारे २४८ भाविक यात्रेत सहभागी होणार आहेत. मागील दहा यात्रांमधून चार हजारांहून अधिक मराठी भाविकांना पंजाब हरियाणा राज्यातील धार्मिक व ऐतिहासिक स्थळांचे आणि संत नामदेव महाराजांच्या कर्मभूमीचे दर्शन घडविण्यात नानक साई फाऊंडेशनला यश आले आहे. भक्ती, संस्कृती, राष्ट्रभक्ती आणि निसर्ग सौंदर्याचा संगम अनुभवण्यासाठी, तसेच पंजाबी पाहुणचाराचा प्रत्यक्ष आनंद घेण्यासाठी यंदाच्या यात्रेत सहभागी होण्याचे असे आवाहन आयोजक समितीने (९८२३२६००७३) केले आहे. पंजाब, दिल्ली, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातील प्रमुख धार्मिक तसेच ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यात येणार आहे अशी माहिती यात्रेचे मुख्य समन्वयक पंढरीनाथ बोकारे यांनी दिली.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!