Thu, Jan 15, 2026
शिक्षण

शिक्षक : विचारांचे शिल्पकार

शिक्षक : विचारांचे शिल्पकार
Ashok Ithape
  • PublishedAugust 17, 2025

समाजाच्या उभारणीचे खरे आधारस्तंभ

शिक्षक म्हणजे समाजाच्या उभारणीचे खरे शिल्पकार. विद्यार्थ्यांच्या मनावर विचारांची, संस्कारांची आणि मूल्यांची ठसा उमटवणारे शिक्षक हे केवळ ज्ञानदाते नसून जीवनदाते असतात. ते केवळ अभ्यासक्रम शिकवत नाहीत, तर व्यक्तिमत्त्व घडवतात. शिक्षकांचे योगदान पिढ्यान्‌पिढ्या समाजाचा चेहरा घडवते.

प्रत्येक यशस्वी व्यक्तीमागे शिक्षकांचे मार्गदर्शन दडलेले असते. ते विद्यार्थी जसे आहेत तसे स्वीकारतात आणि त्यांच्यात सुप्त असलेल्या गुणांना वाव देतात. विद्यार्थ्यांचे मन समजून घेऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे हेच खऱ्या शिक्षकाचे कार्य असते.

शाळा ही विद्यार्थ्यांचे दुसरे घर असते आणि शिक्षक हे त्या घरातील मार्गदर्शक, स्नेही आणि पालकही असतात. शिक्षक आपल्या वागण्या-बोलण्यातून विद्यार्थ्यांना आदर्श निर्माण करून दाखवतात. त्यांच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट विद्यार्थ्यांना शिकवण असते.

शिक्षक हे केवळ विषय शिकवणारे नसतात, तर ते जीवन कसे जगावे हे शिकवतात. ते सहनशीलता, प्रेम, संयम, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा यासारख्या जीवनमूल्यांची शिकवण देतात. शिक्षक विद्यार्थ्यांच्या मनात चांगल्या विचारांची बीजं पेरतात आणि त्यांच्या स्वप्नांना पंख देतात.

आजच्या युगात शिक्षकांची भूमिका अधिक व्यापक झाली आहे. तंत्रज्ञान, इंटरनेट आणि डिजिटल शिक्षणाच्या युगातही शिक्षकांचे महत्त्व कमी झालेले नाही. उलट, हे आधुनिक साधन शिक्षकांच्या मदतीनेच विद्यार्थ्यांपर्यंत पोचते. ऑनलाईन शिक्षण, व्हर्चुअल क्लासेस, डिजीटल साहित्य यांचा वापर करून शिक्षक आजही विद्यार्थ्यांचा ज्ञानप्रवास अधिक परिणामकारक करत आहेत.

भारताला महान वैज्ञानिक, समाजसुधारक, राजकारणी, डॉक्टर, इंजिनिअर देणारे हे शिक्षकच होते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं जीवन हेच शिक्षकांच्या महत्त्वाचे उदाहरण आहे. त्यांनी शिक्षक या नात्याने समाजात विचारांची क्रांती घडवून आणली. म्हणूनच त्यांच्या जयंती दिनी आपण शिक्षक दिन साजरा करतो.

शिक्षक हे केवळ शाळेपुरते मर्यादित नसतात. ते समाजाचे विचारवंत असतात. त्यांच्या कृतीतूनच समाजात सकारात्मक बदल होतो. एक शिक्षक जर ठरवेल, तर तो संपूर्ण गाव बदलू शकतो. शिक्षकाच्या एका प्रेरणादायी वाक्याने विद्यार्थी संपूर्ण आयुष्यभर प्रेरित राहतो.

ग्रामीण भागातील शिक्षक अनेक अडचणींवर मात करून शिक्षणकार्य करतात. कधी वह्यांची कमतरता, कधी साधनांची अनुपलब्धता, तरीही त्यांची निष्ठा आणि सेवाभाव कायम असतो. विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील चमक पाहून ते समाधान मानतात.

आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांवर खूप ताण असतो. अशा वेळी शिक्षक त्यांचं मनोबल वाढवतात. ते परीक्षा फक्त गुणांसाठी नसते, तर आत्मविकासासाठी असते हे पटवून देतात. विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करून त्यांना स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवतात.

असे शिक्षकच समाजाचे खरे शिल्पकार ठरतात. ते भविष्याची उभारणी करतात. त्यांच्या शिकवणुकीचा ठसा विद्यार्थ्यांच्या जीवनात आयुष्यभर राहतो. त्यांनी दिलेल्या शिकवणीच्या आधारावर अनेक विद्यार्थी यशस्वी होतात आणि त्यांचं जीवन उजळून निघतं.

अशा शिक्षकांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांचा सन्मान म्हणजे ज्ञानाचा, संस्काराचा आणि संस्कृतीचा सन्मान आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी आपल्या आयुष्यातील शिक्षकांचे आभार मानावेत आणि त्यांच्या विचारांना आपल्या कृतीत उतरवावं.

कारण, शिक्षक घडवतो समाज, शिक्षक घडवतो राष्ट्र. शिक्षक म्हणजेच विचारांचे खरे शिल्पकार.

शब्दांकन — लोचना जगन्नाथ धनवडे जिल्हा परिषद शाळा येवलेवाडी ता. कडेगाव जि. सांगली*

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!