Thu, Jan 15, 2026
Media

कृष्णातीरची रौप्यमहोत्सवी वाटचाल समृद्ध करणारी : सतीश कुलकर्णी

कृष्णातीरची रौप्यमहोत्सवी वाटचाल समृद्ध करणारी : सतीश कुलकर्णी
Ashok Ithape
  • PublishedJune 26, 2025

दिमाखदार सोहळ्यात वर्धापनदिन साजरा : अनेक मान्यवरांचा शुभेच्छांचा वर्षाव

वाई l विशेष प्रतिनिधी : कृष्णातीर या नावाचे महात्म्य खूप मोठे आहे. त्याच्याशी इमान राखत साप्ताहिक कृष्णातीरने केलेली रौप्यमहोत्सवी वाटचाल समृद्ध करणारी आहे. त्यासाठी संपादक कृष्णात घाडगे यांनी ज्या चिकाटीने जी मेहनत घेतली आहे ती आदर्शवत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत सतिश कुलकर्णी यांनी वाई येथे केेले.

साप्ताहिक कृष्णातीरचा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन सोहळा वाई येथील लोकमान्य टिळक स्मारक संस्थेच्या रमेश गरवारे सभागृहात संपन्न झाला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन कुलकर्णी बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर, युवा साहित्यिक निलेश महिगावकर, ज्येष्ठ पत्रकार दत्ता मर्ढेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. याच सोहळ्यात सहकार क्षेत्रात आदर्शवत काम करणारे छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेचे संस्थापक तथा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रामभाऊ लेंभे, यशस्वी उद्योजक विजयशेठ काळंगे यांना विशेष पुरस्काराने तर पत्रकारीतेत 30 वर्षांहून अधिक काळ यशस्वी कामगिरी करणारे दै. पुढारीचे लोणंद येथील प्रतिनिधी शशिकांत जाधव आणि दै. तरुण भारतचे महाबळेश्‍वर येथील प्रतिनिधी विलास काळे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी पुढे बोलताना सतिश कुलकर्णी म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांच्या आत्मचरीत्राचे नाव कृष्णाकाठ आहे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या महाबळेश्‍वर येथील घराचे नाव कृष्णादर्शन आहे. कृष्णा या नावाच्या महतीची अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्या दृष्टीने कृष्णातीर हे नाव देखील रौप्यमहोत्सवी वाटचालीने आदर्शवत ठरले आहे. या वाटचालीत कृष्णात घाडगे आम्हाला वेळोवेळी सहभागी करुन घेतले याचेही आजच्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनी समाधान वाटते.

शरद काटकर म्हणाले, बातमीदारीक्षेत्रासमोर आज अनेक आव्हाने उभी आहेत. पत्रकारांचा अनेकांकडून केवळ फायद्यासाठी उपयोग करुन घेतला जात आहे. अशा प्रवृत्तींपासून पत्रकारांनी सावध असले पाहिजे. पत्रकारांनी आपल्या सूत्रांचा वापर जनतेच्या कल्यासाठी केला पाहिजे. त्याचसोबत स्वत:च्या प्रपंचाचा देखील विचार केला पाहिजे. केवळ बातमीदारी करुन ग्रामीण भागातील पत्रकारांचा संसार चालू शकत नाही. प्रामाणिकपणे व कष्टाने काहीतरी उद्योग केला पाहिजे. त्यासाठी शशिकांत जाधव आणि विलास काळे यांचा आदर्श घ्यावा. कृष्णातीरचा रौप्यमहोत्सव साजरा होत आहे याचा खूप आनंद आहे. त्यापूर्वीपासून कृष्णात घाडगे आणि माझे संबंध आहेत. स्व. विलास माने, मी आणि कृष्णात अशी तिघांनी साप्ताहिक पोलिसवाणी पासून सुरुवात केली. त्या अर्थाने विलास माने यांच्या मुशीत तयार झालेले आम्ही दोघे आहोत. पत्रकारीतेत स्वत:च्या मर्जीने काम करणे दुरापास्त होत आहे. अशा परिस्थितीत कृष्णात घाडगे यांनी स्वत:च्या मालकीचे साप्ताहिक काढून ते सलग 25 वर्ष चालवले आहे ही खूप महत्वाची गोष्ट आहे.

निलेश महिगावकर म्हणाले, अनेक पत्रकारांमध्ये एक साहित्यीक दडलेला असतो. तो प्रत्येकाने जपला पाहिजे. सध्याच्या परिस्थितीत माध्यमांचा आवाज दाबला जात आहे. इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे फार मोठे आव्हान प्रिंट मिडीयासमोर निर्माण झाले आहे. आजची घटना उद्या समजण्याचे दिवस संपले असून क्षणात ती घटना आपल्याला आता माहिती होते. हे जरी सत्य असले तरी लोकांचा मोठा विश्‍वास हा अजूनही प्रिंट मिडीयावर आहे. तो विश्‍वास टिकवून ठेवण्याचे आव्हान पेलण्याची क्षमता पुढील पिढीत निर्माण केली पाहिजे. मी अकरावीत शिकत असताना कृष्णातीरच्या एका कार्यक्रमासाठी आलो होतो. आज रौप्यमहोत्सवी सोहळ्यात पाहुणा म्हणून मला बोलावले त्याचा विशेष आनंद आहे.

दत्ता मर्ढेकर यांनीही कृष्णात घाडगे यांच्या धडपडीचे कौतुक करुन भुईंज प्रेस क्‍लबची एकजुट कृष्णातीरच्या या वाटचालीत मोलाची असल्याचे सांगितले. डॅडी वाघ यांनीही यावेळी मनोगत व्यक्‍त केले.

यावेळी बोलताना कृष्णात घाडगे यांनी कृष्णातीरच्या 25 वर्षांचा आढावा घेतला. कृष्णातीरने समाजातील भल्या व आदर्श व्यक्तिंना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला. पुरस्कारांचा सध्या धंदा मांडला जात असताना कृष्णातीरकडून मात्र पुरस्कारासाठी कधीच कोणती पावती फाडली जात नाही. आदर्श व्यक्तींसोबत पत्रकारीतेत हयात खर्ची करणार्‍या आमच्या सहकारी पत्रकार मित्रांचा जीवनगौरव पुरस्काराने गौरव करण्यात येत आहे. गेली पंचवीस वर्षे सहकार्य करणार्‍या विविध मान्यवरांचा देखील यंदा आम्ही विशेष सन्मान केला असून त्या सर्वांचे आभार मानने, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्‍त करणे हे आमचे कर्तव्य आहे.
जयवंत पिसाळ यांनी सूत्रसंचालन केले, किरण घाडगे यांनी आभार मानले.

सातारा येथील साहित्य संमेलन आपला अभिमान
पत्रकार आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या पुढाकाराने येणारे साहित्य संमेलन सातारा येथे होत आहे, याचे समाधान आहे. या गोष्टीचा सर्वच पत्रकारांना अभिमान वाटला पाहिजे. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनीच मोलाची जबाबदारी पार पाडली पाहिजे. कृष्णातीरने दिवाळी अंकही दर्जेदार असेच काढले. जिल्ह्यातील सर्वच दिवाळी अंकांचे एक दालन साहित्य संमेलनात असावे, अशी अपेक्षा सतिश कुलकर्णी यांनी व्यक्‍त केली.

……………………………………………………………..

नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविणार

पत्रकार समाजातील उपेक्षित, गरजू घटकांना कशी मदत करु शकतो याची अनेक उदाहरणे शरद काटकर यांनी यावेळी बोलताना दिली. अशा कामांत बापूसाहेब शिंदे यांच्यासारखे समाजातील अनेक लोक मदतीसाठी येतात असे सांगून ते म्हणाले, पाकिट संस्कृती आणि व्यसनापासून पत्रकारांनी दूर राहिले पाहिजे. नितिमत्ता पाळली तर वाईट प्रवृत्ती देखील पत्रकारांना घाबरुन राहतात. पत्रकारांनी काही दिडक्यांत आपली किंमत करु नये. अन्यथा भल्या भल्या पत्रकारांचा र्‍हास होताना आपण पाहिलं आहे. आमचे काही सहकारी पत्रकार मित्र आकस्मिक निधन पावले त्यावेळी हरिष पाटणे, विनोद कुलकर्णी आणि मी पुढाकार घेवून त्यांच्या कुटुंबियांना मदत केली. ही मदतीची वेळ कोणावरही येता कामा नये याची काळजी पत्रकारांनी घ्यायला हवी. इथे उपस्थित असलेले दत्ता मर्ढेकर, फलटणचे अरविंद मेहता आणि पाटणचे पैगंबरवासी इलाही मोमीण या तिघांनी पत्रकारीतेत एकत्र काम करताना मैत्री आणि बातमीदारीचा आदर्श निर्माण केला. या तिघांनीही केलेले संस्थात्मक काम महत्वाचे आहे. मग अशा मंडळींना राजकीय व्यवस्थेत का महत्वाची जबाबदारी आजपर्यंत मिळाली नाही? असा प्रश्‍न काटकर यांनी उपस्थित केला. आपणही व्यवस्थेत जाण्यासाठी कचरता कामा नये, असेही काटकर सांगून व्यापक जनहितासाठी आपण सातारच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

मयुरी पिसाळचे कौतुक
पत्रकारीता, मालिका, चित्रपट, कथा, कादंबरी अशा विविध प्रांतात लेखन मुशाफिरी करणार्‍या युवा साहित्यिक निलेश महिगांवकर यांनी पत्रकारीतेच्या सद्य परिस्थितीचा घेतलेला आढावा उपस्थितांना विशेष भावला. भुईंज प्रेस क्बबचे संस्थापक व वाई तालुका पत्रकार संघाचे भावी अध्यक्ष जयवंत पिसाळ यांचा त्यांनी यावेळी विशेष उल्लेख करुन त्यांची कन्या मयुरी पिसाळ हिच्या वक्तृत्व कौशल्याचेही यावेळी कौतुक केले.

यावेळी वाई तालुका सह. सूतगिरणीचे संचालक यशवंत जमदाडे, मंगलश्याम कन्ट्रक्शनचे नंदकिशोर परदेशी, जीवनप्रकाश हॉस्पिटलचे डॉ. मनोहर ससाणे, तिरंगा एज्युकेशन सोसायटीचे सचिव जयवंत पवार, प्रगतीशील शेतकरी शिवाजीराव करपे, गजानन इलेक्ट्रिकलचे दिपकशेठ चव्हाण, छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेच्या एरोली मुंबई शाखेचे सल्लागार प्रताप निंबाळकर, किसन वीर सह. साखर कारखान्याचे संचालक किरण काळोखे, भैरवनाथ पोल्टी फार्मचे धनंजय बाबर यांच्या वतीने हेमंत बाबर, रत्नप्रभा कन्स्ट्रक्शनचे विजससिंह चव्हाण यांच्यावतीने संजय माटे यांना कृष्णातीरच्या वतीने विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमांस दैनिक सकाळचे व्यवस्थापक राजेश निंबाळकर, निवृत्त अतिरिक्त पोलिस अधीक्षक राजेंद्र शेळके साो, येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक रविंद्र शेळके, वाईचे सहाय्यक निंबधक अनिल क्षिरसागर, लोणंद नगरपंचायतीचे नगरसेवक संदीप शेळके, लोंणद मराठा समाज महासंघाचे अध्यक्ष हेमंत निंबाळकर, अरविंद आंदलिंगे, उत्कर्ष पतसंस्थेचे व्यवस्थापक प्रकाश पवार, सृजन फाऊडेशनचे अध्यक्ष अजित जाधव, संतोष शिंदे, संभाजी लावंड, वासिम पिंजारी, काळंगवाडीचे सरपंच गणेश मोहळकर,
उपसरपंच लालासाहेब पवार, बाजार समितीचे संचालक नवनाथ काळंगे, माजी उपसरपंच धनसिंग पवार, स्कूल कमिटीचे अध्यक्ष संदेश चव्हाण, प्रमोद काळंगे पत्रकार विश्वास पवार, भद्रेश भाटे, किशोर रोकडे, विलास साळुंखे, पाडुंरंग खरे, सचिन इथापे, दिलीप कांबळे, हेमंत बाबर, संजय माटे, संजय भंडाळकर, जल्लोषचे संपादक अशोक येवले, नवदर्पणचे संपादक संदिप माने, वंदनसृष्टीचे संपादक अरूण जायकर, संकल्प न्युजचे संपादक अशोक इथापे, वंदनसृष्टीचे कार्यकारी संपादक उध्दव कर्णे, मारूती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रामराव जाधव, उपाध्यक्ष अशोक निंबाळकर, विठठल जाधव, शंकर जाधव, लहू गोळे,राहुल गोळे, सचिन गोळे, धनाजी घाडगे, नितीन घाडगे, राजेंद्र चव्हाण दिलीप चव्हाण, अरूण चव्हाण, मुगुटराव इथापे, पठारे, राजू गोळे, वैशाली गोळे उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!