Thu, Jan 15, 2026
अध्यात्म

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे जिल्ह्यात भक्तीमय वातावरणात आगमन

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे जिल्ह्यात भक्तीमय वातावरणात आगमन
Ashok Ithape
  • PublishedJune 26, 2025

फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिभजनात तल्लीन होऊन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा भक्तीरसात चिंब न्हाऊन निघाला.

सातारा दि. 26 : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठ्या आनंदाने आणि भक्तीमय वातावरणात सातारा जिल्ह्यात पाडेगाव येथे आगमन झाले. फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिभजनात तल्लीन होऊन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा भक्तीरसात चिंब न्हाऊन निघाला.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होताच जिल्ह्याच्यावतीने पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार नितीन पाटील, आमदार सचिन पाटील, आमदार मनोज घोरपडे, माजी खासदार रणजीतसिंह नाईक- निंबाळकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी वाईचे प्रांतअधिकारी राजेंद्र कचरे यांनी पुष्प अर्पण करुन व पोलीस बँड पथकामार्फत विविध धून वाजून स्वागत केले.

नीरा नदीतील स्नानानंतर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे मान्यवरांनी तसेच लाखो भाविकांनी दर्शन घेतले. माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2025 निमित्त वारकऱ्यांच्या सेवेसाठी गावनिहाय सुविधा माहिती व लोकेशन मार्गदर्शनाचा क्यूआर कोड https://smartpanchayat.in/palakhi/ पंचायत समिती खंडाळा व फलटण यांनी उत्कृष्ट पद्धतीने पहिल्यांदाच तयार केला आहे. याद्वारे वारकऱ्यांच्या सोयीसाठी काही गावांमध्ये अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या माध्यमातून प्रत्येक गावातील शौचालय, आरोग्य सेवा, पाणी, महिला स्नानगृहे, मुक्काम, निवास, पेट्रोल पंप व संपर्क माहिती मिळत आहे, याबद्दल वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

प्रशासनाने वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी पिण्याचे पाण्याचे टँकर, आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच जागोजागी स्वच्छतागृहांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षेतेसाठी चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आलेला आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!