कामगार प्रबोधन दिंडीचा पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभाग
![]()
विठुनामाचा गजर, अभंग, ओव्यांची संगत आणि पावसाच्या सरींसह श्री क्षेत्र देहु ते आकुर्डीतील तुळजा भवानी मंदिरापर्यंत दिंडीने मार्गक्रमण केले.
वाई : संत तुकाराम महाराजांच्या ३४० व्या पालखी प्रस्थान सोहळ्यात कामगार आणि कामगार कुटुंबीयांनी आज मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या पुणे गट कार्यालयाकडून कामगार प्रबोधन दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
विठुनामाचा गजर, अभंग ओव्यांची संगत आणि पावसाच्या सरींसह श्री क्षेत्र देहु ते आकुर्डीतील तुळजा भवानी मंदिरापर्यंत या दिंडीने मार्गक्रमण केले. कामगार कल्याण आयुक्त मा.श्री.रविराज इळवे यांच्या संकल्पनेतून मागील वर्षापासून कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी या प्रबोधन दिंडीचे आयोजन करण्यात येत आहे. गुणवंत कामगार श्रीकांत (अण्णा) जोगदंड व त्यांच्या पत्नी संगीता यांनी दिंडीत विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा करत सर्वांचे लक्ष वेधले. प्रकाश घोरपडे, सुभाष चव्हाण, सुरेश कंक यांनी देखील विविध संतांची वेशभूषा करत संतांच्या विचारांचा जागर केला.
यावेळी जाधववाडी येथील कामगार भजनी मंडळाने भजन, अभंग व गवळणी सादर करत वातावरण भक्तीमय केले. ह.भ.प.शामराव गायकवाड महाराज यांनी देखील प्रवचनातून उपस्थितांचे प्रबोधन केले. व्याख्यात्या श्रीमती शारदाताई मुंडे, साहित्यिक श्री.राजेंद्र घावटे, कामगार भूषण श्री.राजेंद्र वाघ गुणवंत कामगार कल्याण मंडळ संघटनेचे सचिव श्री.राजेश हजारे, उपाध्यक्ष श्री.तानाजी एकोंडे गरवारे टेक्निकल फायबर्स वाई येथून युनियनचे खजिनदार तसेच विश्वकर्मा कामगार पुरस्कार्थी श्री शंकरराव मांढरे, गुणवंत कामगार पुरस्कार्थी श्री अमृत साळुंखे, श्री नितीन गायकवाड,श्री शेखर पवार,श्री रमेश पांडकर यांच्यासह विविध आस्थापनांचे शंभरपेक्षा जास्त कामगार व कामगार कुटुंबीय दिंडीत सहभागी झाले होते.
मंडळाच्या पुणे विभागाचे प्र.सहाय्यक कल्याण आयुक्त श्री.मनोज पाटील यांच्या नेतृत्वात अधीक्षक श्री.संजय थोरात, कल्याण निरीक्षक श्री.संदीप गावडे, केंद्र संचालक श्री.प्रदीप बोरसे, श्री.सुनिल बोरावडे, श्री.अविनाश राऊत, श्री.अनिल कारळे यांनी दिंडी यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले













