Thu, Jan 15, 2026
यशोगाथा

मांढरदेव येथील शंकरराव मांढरे यांना “दि प्राइड ऑफ इंडिया भास्कर ॲवॉर्ड ” जाहीर

मांढरदेव येथील शंकरराव मांढरे यांना “दि प्राइड ऑफ इंडिया भास्कर ॲवॉर्ड ” जाहीर
Ashok Ithape
  • PublishedMay 25, 2025

कर्म की दुनिया में श्रम सभी को करना पडता है. भगवान सिर्फ लकिरे देता है, रंग हमे ही भरना पडता है!

वाई: पश्चिम महाराष्ट्रातील पर्वतराजीवरील तीर्थक्षेत्र मांढरदेव (जि. सातारा) येथील शंकरराव मांढरे या तरुण तेजांकितांचे कर्तृत्वच बोलके आहे. उपेक्षितांचे एकत्रिकरण, कामगार संघटन, विकासकारण, लोककारण आदी क्षेत्रांत तेजाने तळपणाऱ्या कार्य, कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी त्यांना “प्राइड ऑफ इंडिया, भास्कर ॲवॉर्ड ” देऊन गौरविण्यात येत आहे.

मुबलक पाऊस पण खडकाळ, मुरमाड जमीन यामुळे शेतीसाठी पाणी नाही. अशा स्थितीत मांढरे परिवार मुंबईत कष्टाची भाकर खात होता. वडिलांच्या आजारपणात नाईलाजाने गावी यावे लागले. वडिलांचे औषधपाणी, सेवा-सश्रुषा , ज्येष्ठ सुपुत्र या नात्याने पोरवयातील शंकर यांना करावा लागे.

कौटुंबिक गरज म्हणून १९९५ पासून ते वाईच्या गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीत कामगार म्हणून रुजू झाले. नोकरी करीत करीत शिक्षणही त्यांनी चालू ठेवले. कौटुंबिक अडचणींमुळे बारावीतून शिक्षण सोडावे लागलेल्या या शिक्षणप्रेमी समाजाच्या प्रतिनिधीने नोकरी करीत करीतच पदवी आणि आता एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे.

वर्गात मॉनिटर, आरएसपी लीडर अशा जबाबदाऱ्यातून त्यांच्यात विद्यार्थीदशेपासून नेतृत्व गुण विकसित झालेच होते. त्यातूनच मातृभूमी विषयक तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. गाव बांधिलकीतून त्यांनी नेहरू युवा मंडळातून आपल्या सामाजिक कार्याची सुरवात केली.

श्री काळेश्वरी मांढरदेवी मंदिर परिसरात त्यांनी छोट्या दुकानदारांची संघटना बांधली. देवस्थान ट्रस्ट व दुकानदार यांच्यात योग्य तो समन्वय घडवून समस्या सोडविल्या. गरवारे मधील कामगारांसाठी विश्वश्री हाउसिंग सोसायटी स्थापन करून त्यांना हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्यात अध्यक्ष या नात्याने मांढरे यांनी योगदान दिले. एम्पलॉइज युनियनचे जनरल सेक्रेटरी व विविध पदांवर काम केले आजही ते काम अव्याहतपणे सुरूच आहे.

कामगारांच्या सूचनांना व्यासपीठ, त्यांच्या मदतीने रक्तदान शिबिरे, ड्रायव्हिंग कॅम्प, हेल्मेट वाटप यांसारखे कामगार हिताचे उपक्रम राबविण्यात शंकरराव सदैव अग्रभागी असतात. पगार वाढीच्या यशस्वी वाटाघाटीत, करारात सहभागी असतात.
निराधारांना संजय गांधी स्वावलंबन योजनेचे अर्थसहाय्य, दारिद्र्य रेषेखालील गरिबांना घरकुले मिळवून देणे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद जबाबदारीने भूषविले, मैदानाचे सपाटीकरण, वृक्षारोपण अशा कामांतून शंकरराव यांचे नेतृत्व मोठे होत गेले.
ग्रामपंचायत सदस्य म्हणून गावकऱ्यांनी संधी दिली. पाच वर्षे सदस्य व पाच वर्षे कर्तव्यनिष्ठेन उपसरपंच पदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोरोना काळात केलेली भरीव मदत,  उन्हाळ्यात पिण्याच्या दाही दिशा भटकणाऱ्या माता भगिनींच्या डोक्यावरचा हंडा खाली यावा, यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. परिसरातील सुमारे १०  ते १२ वाड्या, वस्त्या, गावे यांच्याकरिता महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री श्री. मकरंद पाटील यांच्या माध्यमातून प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यासाठी व कार्यान्वित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.

मांढरदेवीची पौष पौर्णिमेला महाराष्ट्रातील मोठी यात्रा भरते. यात्रा कालावधीत वाहन पार्किंग व अन्य कारणाने शेतकऱ्यांना आपली पिके शेतातच सोडून द्यावी लागतात. त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी भूमाता शेतकरी विकास संस्थेची स्थापना करून त्या माध्यमातून शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यात अध्यक्ष म्हणून शंकरराव मांढरे अग्रभागी असतात. परिसरातील शंभू महादेव पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन म्हणून जबाबदारी पेलताना लिक्विडेशनमध्ये गेलेली ही संस्था त्यांनी ब वर्गामध्ये आणून सावरली. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय असे कार्य केले.

ग्रामीण कुटुंबांना शौचालय बांधण्यास उत्तेजन देणारा उपसरपंच, गावकारभारी अशी मांढरे यांची ओळख आहे. शंकररावांमध्ये असलेल्या आत्मविश्वासाची प्रचिती असलेली कार्यकर्त्याची शक्ती जाणून, गरवारे कंपनीच्या माध्यमातून केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल महाराष्ट्र शासनाने या कर्तव्यनिष्ठ कार्यकर्त्याला महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते गुणवंत कामगार पुरस्कार देऊन गौरविले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!