![]()
उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल गोव्यात होणार सन्मान.
सातारा / प्रतिनिधी : साताऱ्यातील संजीवनी बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व सुप्रसिद्ध व्यापारी रवींद्र उत्तमराव कांबळे यांना महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनतर्फे दिला जाणारा अत्यंत मानाचा असा “प्राइड ऑफ इंडिया -भास्कर अवॉर्ड” जाहीर झाला आहे. उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल गोव्यात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होणार असून या पुरस्काराबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
गेल्या 21 वर्षांपासून महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना “प्राइड ऑफ इंडिया -भास्कर अवॉर्ड” या पुरस्काराने गौरवण्यात येते. दरवर्षी हा पुरस्कार वितरण सोहळा गोवा राज्याची राजधानी पणजी येथे दिमाखदार स्वरूपात साजरा होत असतो. यंदा पणजीत मीरामार बीच मार्गावरील दीनानाथ मंगेशकर सांस्कृतिक सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते व गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक 26 मे रोजी सकाळी अकरा वाजता हा पुरस्कार वितरण समारंभ होईल. त्यावेळी भाजपाचे गोवा राज्य माजी अध्यक्ष खा. सदानंदशेठ तानावडे, पर्यटन मंत्री रोहन कवठे, माजी केंद्रीय मंत्री ॲड. रमाकांत खलप, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत ,महिला काँग्रेसच्या राज्याध्यक्ष डॉ. प्रतिक्षा खलप, दैनिक तरुण भारतचे आवृत्तीप्रमुख सागर जावडेकर, कोल्हापूरच्या हृदयरोग तज्ञ डॉ. पियू धनवडे, पाचगणीच्या बिली मोरया हायस्कूलच्या संचालिका श्रीमती आदिती गोराडिया, पलूस येथील जनसेवा महिला सोसायटीच्या संस्थापक अर्चनाताई माळी, भास्कर पब्लिकेशन न्यूज नेटवर्कचे संस्थापक राजीव लोहार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
रवींद्र कांबळे हे गेल्या पंचवीस वर्षांपासून समाजकार्यांमध्ये सक्रिय आहेत. जिल्ह्यातील सर्व खाजगी रुग्णालयांमध्ये उपचाराचे दर पत्रक लावण्यासाठी सर्वप्रथम आंदोलन करून त्याची अंमलबजावणी करण्यास भाग पाडले. याशिवाय कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि आपला व्यवसाय सांभाळत
सामाजिक बांधिलकीतून मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी मोफत अंत्यविधी साहित्य वाटपाचा उपक्रम गेल्या दहा वर्षांपासून त्यांनी राबवला आहे. तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना दररोज मोफत उत्तम दर्जाचे अन्नदान करण्याचा उपक्रम ही त्यांनी गेल्या दहा वर्षांपासून राबवला आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना दुपारच्या वेळी मोफत फळांचे वाटप व रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना मोफत स्वच्छ पाण्याचे वाटप उपक्रम ही त्यांनी संस्थेच्या पुढाकारातून गेल्या वर्षभरापासून सुरू केला आहे.
कोरोना, भूकंप, अतिवृष्टी, भूस्खलन, महापूर आदी नैसर्गिक आपत्तीच्या वेळी गरजूंना जीवनावश्यक साहित्याचे वाटप व मानसिक आघात देण्याचा प्रयत्न श्री. कांबळे यांनी केला आहे. याशिवाय समाजातील निराधार व गरजूंना वेळोवेळी मोफत भाजीपाला वाटप करण्याबरोबरच बेवारस, वयोवृद्ध, निराधार आणि मनोरुग्ण व्यक्तींना शाब्दिक व आर्थिक आधार देत त्यांना धीर देण्यासाठीही ते आग्रही असतात. याशिवाय १६१६ अनाथ मुलींचा विवाह करून देण्याचा संकल्प त्यांनी केला असून दि प्राईड ऑफ इंडिया भास्कर ॲवॉर्ड जाहीर झाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.













