स्त्री शिकली की तिचे व समाजाचे आरोग्य सुधारते ; डॉ.शेखर कुलकर्णी
वाई, ता.१८ : स्त्रियांचे आरोग्य शिक्षणाशी निगडित असते स्त्री शिकली की तिचे व समाजाचे आरोग्य देखील सुधारते असे सुप्रसिद्ध लेखक व कन्सल्टंट ब्रेस्ट सर्जन डॉ शेखर कुलकर्णी वाई वसंत व्याख्यानमालेच्या अठराव्या पुष्पात ‘स्त्री आरोग्य’ या विषयावर बोलताना म्हणाले. यावेळी वाईतील सर्वपरिचित स्त्रीरोग तज्ञ व लेखिका डॉ स्वाती देशपांडे अध्यक्षस्थानी होत्या.
डॉ कुलकर्णी म्हणाले, आरोग्य म्हणजे केवळ रोगाचा अभाव नव्हे तर शारीरिक मानसिक व आध्यात्मिक दृष्ट्या देखील सुस्वरूप असणे. आजची बदलती जीवनशैली पाहता भविष्यात प्रत्येक दोनातील एका माणसाला कर्करोग होईल असे अनुमान शास्त्रज्ञांनी काढले आहे. भारतातील माडिया गोंड या आदिवासी जमातीत कर्करोगाचे प्रमाण ० % होते. याचे कारण त्यांची नैसर्गिक जीवनशैली होती. मात्र शहरीकरणाचा रेटा तिथवरही पोहोचला व आज तेथेही कर्करोगाचे रोगी निर्माण होत आहेत.
अमेरिकेत ८ पैकी १, पुण्यात २२ पैकी १ तर खेडेगावात ६५ पैकी १ असे ब्रेस्ट कॅन्सर असणाऱ्या स्त्रियांचे सर्वसाधारण प्रमाण आहे. यावरून शहरी जीवनशैलीचा नकारात्मक परिणाम कळतो. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारतातील सर्वसाधारण आयुर्मान ४७ वर्षे होते आता ते ७० झाले आहे. आयुर्मान वाढले की वृद्धापकाळातील रोगांचे प्रमाण प्रमाणही वाढते.
डॉक्टर म्हणून काम करताना स्त्रिया स्वतःसाठी जगत नाहीत हे लक्षात आले. सुशिक्षित स्त्रिया देखील घरातल्या कामात अडकतात व आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. मुलाची दहावी ,सासूबाईंचे आजारपण अशा कारणांनी त्रास होत असतानाही त्या दवाखान्यात जायचे टाळतात. स्त्रीने स्वतःच्या आरोग्याकडे स्वतः लक्ष देणे गरजेचे. प्रत्येक स्त्रीने चाळिशीनंतर मेमोग्राफी करून घ्यावी.
मानवी शरीराची उत्पत्ती झाली तेव्हा तो रोज दहा मैल चालत होता. आज चालणे कमी झाले आहे व बसणे जास्त. बसून राहणे आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे याला न्यू एज स्मोकिंग असे देखील म्हणतात.
उत्तम आरोग्यासाठी रोज भरपूर चाला, निसर्गाशी मैत्री करा, रोज आठ तास झोपा, ऋतूनुसार आहार घ्या, प्रथिने, जीवनसत्वे यांच्या सप्लीमेंट्स डेफिशियन्सी असेल तरच घ्या. व्हाट्सअप फॉरवर्ड सारख्या माध्यमांवरच्या आरोग्याच्या टिपण्या पुरावारहित असतात.
कुलकर्णी यांनी कर्करोग व इतर रोगांपासून दूर राहण्यासाठी नैसर्गिक जीवनशैलीचा अवलंब करण्यास सांगितले. डॉ अंजली पतंगे यांनी प्रास्ताविक केले. श्रीमती विजया शेंडे यांनी परिचय केला, सहकार्यवाह डॉ रुपाली अभ्यंकर यांनी वक्ते डॉ कुलकर्णी यांचा सत्कार केला तर सौ कीर्ती सोहनी यांनी आभार मानले. श्रीमती प्रतिभा पोरे व श्रीमती विजया शेंडे कार्यक्रमाच्या प्रायोजक होत्या. स्त्री आरोग्य या विषयाला पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्याबद्दल डॉ शेखर कुलकर्णी यांनी कौतुक व्यक्त केले.
फोटो ओळी :- वक्ते डॉ शेखर कुलकर्णी यांचा सत्कार करताना सहकार्यवाह डॉ रुपाली अभ्यंकर शेजारी अध्यक्षा डॉ स्वाती देशपांडे













