Thu, Jan 15, 2026
साहित्य

‘शिवतीर्थ’ भविष्याची दृष्टी असणारी पुस्तिका प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांचे प्रतिपादन

‘शिवतीर्थ’ भविष्याची दृष्टी असणारी पुस्तिका प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांचे प्रतिपादन
Ashok Ithape
  • PublishedMay 18, 2025

प्रकाशन सोहळयावेळी ‘शिवतीर्थ’चा रेकॉर्ड ब्रेक

सातारा l प्रतिनिधी : सध्या इतिहासाचे अवमुल्यन होत आहे. इतिहासाचा विपर्यास होत आहे. धार्मिक द्वेष वाढत आहे. हे सर्व थांबवण्यासाठी आणि साताऱ्याच्या इतिहासाचा वारसा आहे. तो जपण्यासाठी शिवतीर्थ ही पुस्तिका दीपक प्रभावळकर यांनी लिहिली आहे. ती इतिहासाची भान जपणारी आहे, सामाजिक जाण असणारी आहे. तरुण पिढीला प्रेरक ठरेल. भविष्याची दृष्टी देणारी ‘शिवतीर्थ’ पुस्तिका आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी केले. दरम्यान, शिवतीर्थ या पुस्तिकेने प्रकाशन सोहळयावेळीच रेकॉर्ड ब्रेक केले. पुस्तिकेच्या प्रती हातोहात खपल्या.

शिवतीर्थ परिसरातील हेम एक्स्क्लुझिव्हच्या हॉलमध्ये शिवतीर्थच्या प्रकाशन सोहळयात प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे हे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र चोरगे हे होते. यावेळी व्यासपीठावर साहित्यिक डॉ. राजेंद्र माने, सातारा हिल हाफ मॅरेथॉनचे संस्थापक डॉ. संदीप काटे, छ. शाहु महाराजांचे अभ्यासक अजय जाधवराव, धीरेंद्र राजपुरोहित, दीपक प्रभावळकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलतना प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे म्हणाले, सातारला एक उदात्त वारसा आहे. तो जपण्यासाठी, त्या वारशाचे संवर्धन करण्यासाठी शिवतीर्थ ही पुस्तिका प्रेरक ठरेल, सध्या इतिहासाचे अवमूल्यन होत आहे.

कुठलाही देश असो वा राज्य, त्यांचा इतिहास जपण्याचे काम हे तेथील वत्ते, लेखक करत असतात. दीपक प्रभावळकर यांची पुस्तिका उद्याच्या विचारांना बळ देण्याचे काम करणारी आहे. दीपक प्रभावळकर हे जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असते तर ते अष्टप्रधान मंडळात असते, असे सांगत पुढे म्हणाले, त्यांनी कोरोना काळात कोव्हीडायन हे पुस्तक लिहून त्या काळातल्या सत्य घटना मांडून प्रशासनावर आसूड ओडले आहेत. तसे ही शिवतीर्थ ही पुस्तिका एक वैभव आहे. प्रभावळकर हे स्पष्ट बोलणारे आणि परखड लिहणारे आहेत. त्यांनी ही पुस्तिका हौस म्हणून लिहिली नाही तर सध्या इतिहासाचा विपर्यास होतोय म्हणून लिहिली आहे.

शिवतीर्थ हा शब्द कागदोपत्री नोंद करायला दीपक सरांनी एक चळवळ चालवली आणि पाठपुरावाही केला. शिवतीर्थ या नावाने सातरची ओळख व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वाक्याप्रमाणे इतिहास हा जगवावा लागतो, त्याप्रमाणे लोक कल्याणाची साधन ज्यांच्या हातात पडतात ती माणसं घडवत असतात. प्रभावळकर यांचे हे पुस्तक इतिहास भान असणारे, समाजाची जाण असणारे, भविष्याची दृष्टी देणारे आहे, असे त्यांनी सांगितले.

डॉ.राजेंद्र माने म्हणाले, शिवतीर्थ या पुस्तिकेत छ. शिवाजी महाराजांच्या मुर्तीबाबत माहिती दिली गेली आहे. छ. शिवाजी महाराजांची मूर्ती युद्ध सज्ज आहे असे बरेच प्रसंग त्यात आहेत. आपल्या साताऱ्याबाबत अनेक गोष्टी आजही ज्ञात नाहीत. मी रहात असलेल्या रामाच्या गोटात हौद आहे त्याची मला माहिती नव्हती. सातारा शहराचा संदर्भ ठेवाच असलेली ही पुस्तिका आहे. छ. शाहू महाराजांचे चरित्र लिखीत स्वरुपात उपलब्ध नाही हे आम्हा साहित्यिकांचे अपयश आहे. छ. शाहू महाराजांच्या काळातल्या काही टिपण्या सापडत नाहीत. जिह्यात किती महापुरुषांचे पुतळे आहेत, त्यांची स्थापना कुणी केली?, याची सर्व माहिती या पुस्तिकेत आहे. ही पुस्तिका नवीन पिढीसाठी महत्वाची आहे. प्रभावळकरांनी बरेच मुद्दे त्यात मांडले असून प्रकाशझोत टाकला आहे. त्यावर प्रतिवाद होऊ शकतात. ही पुस्तिका चिंतन करायला लावते आहे. प्रभावळक यांनी एखादा छ. शाहु महाराजांच्यावर चांगला ग्रंथ निर्माण करावा, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. संदिप काटे म्हणाले, शिवतीर्थाबाबत माहिती देणारी ही पुस्तिका गरजेची होती. प्रभावळकर हे 12 फेब्रुवारीला स्वाभिमान दिवस करत असतात. त्या दिवसाचे महत्व आजही अनेक सातारकरांना माहिती नाही. मी 2004 साली साताऱ्यात सेटल व्हायला आलो तेव्हापासून दहा वर्ष मलाही साताऱ्याबद्दल माहिती नव्हते. की साताऱ्याची स्थापना कोणी केली. ही पुस्तिका संदर्भ ग्रंथ आहे, असे मत मांडले. तसेच राजेंद्र चोरगे आणि अजय जाधवराव यांनी ही आपले मत व्यक्त करत शिवतीर्थ या पुस्तिकेबद्दल आणि छ. शाहु महाराजांच्या कार्याची माहिती त्यांनी सांगितली.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते सागर भोसले, महारुद्र तिकुंडे, ऍड.नितीन शिंगटे, रवी पवार, अॅड.मनीषा बर्गे, पत्रकार अजित जगताप, प्रगती पाटील, अमोल सणस, डॉ.यशवंत पाटणे, श्रीकांत आंबेकर, दीपक भुजबळ, अॅड.प्रवीण दळवी, अॅड.जगताप, अभिजित बारटक्के, अविनाश कोळपे, कन्हैयालाल राजपुरोहित यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रकाश राजे यांनी सुत्रसंचालन केले तर स्वागत व आभार सुदाम दादा गायकवाड यांनी मानले.
दीपक प्रभावळकरांनी केला शिवतीर्थाच्या अंतरंगाचा उलघडा
दीपक प्रभावळकर यांनी आपल्या प्रस्ताविकात म्हटले आहे, नुकताच युद्धाचा काळ सुरू आहे युक्रेनमध्ये काय सुरु आहे, इस्राएल मध्ये काय सुरू आहे, हे आपल्याला माहिती आहे. पण आपल्या महादरे तळ्याच्यावरच्या बाजूला असलेल्या हत्ती तळ्याची माहिती नाही. कमानी हौद माहिती नाही, आपल्या शहराचा इतिहास माहिती नाही. सातारा नगरीचे संस्थापक छ. शाहु महाराज यांची माहुलीला समाधी आहे हे आपल्याला माहिती नाही. शहरातील या बारीक सारीक घटनांवर लिहले पाहिजे, असा विचार करुन ही पुस्तिका लिहिली. हे पुस्तक नाही तर पुस्तिका आहे. बुद्धीवंतांसाठी नाही तर तरुणांसाठी आहे. नवीन मुलांच्या हातात असावी म्हणून सोप्या भाषेत लिहिली आहे, असे सांगत त्यांनी शिवतीर्थाचे अंतरंग मांडले.

प्रकाशन सोहळ्यावेळीच रेकॉर्ड ब्रेक
दीपक प्रभावळकर यांचे पुस्तक म्हणले की वाचकांना एक हुरहुर लागलेली असते. कोरोना काळातील कोव्हीडायन या पुस्तकानंतर शिवतीर्थ हेही पुस्तक प्रकाशन सोहळयाच्या कार्यक्रमावेळीच सर्व प्रतिची हातोहात विक्री झाली. त्यामुळे शिवतीर्थने रेकॉर्डब्रेक केले आहे.

फोटो ओळी : सातारा : शिवतीर्थचे प्रकाशन करताना डॉ. संदीप काटे, अजय जाधवराव, राजेंद्र चोरगे, दीपक प्रभावळकर, डॉ. राजेंद्र माने, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, धीरेंद्र राजपुरोहित.(छाया-तबरेज बागवान)

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!