वाईत १७ ते १९ ऑक्टोबरदरम्यान दहावी मानसिक आरोग्य व्याख्यानमाला
किसन वीर महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागाचा उपक्रम; नामवंत तज्ज्ञ करणार मार्गदर्शन
वाई : प्रतिनिधी

आजच्या धावपळीच्या जीवनात वाढता मानसिक ताण, नातेसंबंधांतील गुंतागुंत आणि संवादाचा अभाव यामुळे मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करण्याची गरज वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालय, वाई येथील मानसशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त आयोजित करण्यात येणारी दहावी तीन दिवसीय मानसिक आरोग्य व्याख्यानमाला शनिवार, दि. १७ ते सोमवार, दि. १९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. दररोज सायंकाळी ६.३० वाजता कै. सत्यवती जोशी सभागृह, कन्या शाळा, वाई येथे ही व्याख्यानमाला होणार आहे.
व्याख्यानमालेचे उद्घाटन शनिवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी न्युफ्लेक्स टॅलेंट सोल्युशन्स प्रा. लि., पुणे येथील डॉ. भूषण केळकर यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनानंतर समुपदेशक डॉ. मधुरा केळकर या ‘मन ऐका, मन समजा’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
रविवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी पुण्यातील केईएम रुग्णालयाचे प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. वासुदेव परळीकर हे ‘ऐकणारे कान, समजून घेणारे मन’ या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. तर सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी समुपदेशक डॉ. रुद्राक्षी करौशी या ‘ऐकण्यापासून कृतीपर्यंत’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
मानसिक आरोग्याविषयी जागरूकता हा व्याख्यानमालेचा मुख्य उद्देश
मानसिक आरोग्याच्या समस्या समजून घेणे, भावनिक गरजा ओळखणे, योग्य संवाद साधणे आणि आवश्यकतेनुसार तज्ज्ञांची मदत घेणे, या महत्त्वपूर्ण बाबींविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा व्याख्यानमालेचा प्रमुख उद्देश आहे. मानसिक आरोग्यविषयक समस्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याबरोबरच त्यावरील उपाययोजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे.
किसन वीर महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागाच्या वतीने गेल्या दहा वर्षांपासून या व्याख्यानमालेचे आयोजन केले जात आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून मानसिक आरोग्याविषयी समाजात जागरूकता निर्माण करण्याचे काम या उपक्रमाच्या माध्यमातून सातत्याने केले जात आहे. यंदाही विद्यार्थी, शिक्षक आणि सर्वसामान्य नागरिकांना मानसिक आरोग्याच्या विविध पैलूंची माहिती घेण्याची संधी मिळणार आहे.
या तीन दिवसीय व्याख्यानमालेस नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांसह आणि मित्रपरिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. आनंद घोरपडे, प्रा. वीणा जाधव आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी केले आहे.





















