Wed, Mar 4, 2026
यशोगाथा

देगावच्या लेकीने जिद्द, शिस्त आणि देशभक्तीचा उंचावला झेंडा

देगावच्या लेकीने जिद्द, शिस्त आणि देशभक्तीचा उंचावला झेंडा
Ashok Ithape
  • PublishedMarch 4, 2026

भुईंजच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ ची उज्वल परंपरा कायम, कु. आराध्या भोसले हिची सैनिक स्कूल सातारा येथे निवड

भुईंज प्रतिनिधी : ग्रामीण भागातूनही स्वप्नांना पंख मिळू शकतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. भुईंज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ येथील इयत्ता पाचवीत शिकणारी कु. आराध्या सूर्यकांत भोसले हिने ३०० पैकी २६७ गुण मिळवत Sainik School Satara येथे प्रवेश मिळवून शाळेचे, गावाचे आणि जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे.

आराध्याच्या या यशामागे कुटुंबातील देशसेवेची परंपरा ठामपणे उभी आहे. आजोबा नारायण भोसले हे माजी पोलीस अधिकारी तर वडील सूर्यकांत भोसले हे माजी सैनिक आहेत. लहानपणापासूनच शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रसेवेचे संस्कार घरातून मिळाल्याने आराध्याने अभ्यासासोबत विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी केली. कष्ट, चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्या बळावर तिने हे यश संपादन केले.

या गौरवास्पद यशाबद्दल भुईंजचे लोकनियुक्त सरपंच विजय वेळे यांच्या शुभहस्ते आराध्याचा सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका सविता जगताप यांच्यासह छाया शिंगटे, मनीषा राऊत, विजय पवार, अश्विनी जाधव, ज्योती ससाणे, शितल फावडे, सुजाता बोडरे व आई पूजा भोसले आदी शिक्षकवृंदाने आराध्याच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देत अभिनंदन केले.

कार्यक्रमास शाळेतील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आराध्याचे यश हे केवळ वैयक्तिक नाही, तर जिल्हा परिषद शाळांमधील गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिक्षकांची मेहनत आणि पालकांचा विश्वास यांचे प्रतीक आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी हे यश प्रेरणादायी दीपस्तंभ ठरेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

फोटो : कु. आराध्या हिचा सत्कार करताना सरपंच विजय वेळे, सविता जगताप, पूजा भोसले, विजय पवार, छाया शिंगटे, मनीषा राऊत, अश्विनी जाधव.

छाया : सचिन इथापे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!