नव्या शैक्षणिक धोरणाची यशस्वी पाऊलवाट
![]()
व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल, वाई येथे ‘प्रोजेक्ट डे’ दिमाखात संपन्न.
वाई : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या ध्येयधोरणांनुसार विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, अनुभवाधारित शिक्षण व मूल्यसंस्कार यांना केंद्रस्थानी ठेवत महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था संचलित व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल, वाई येथे शुक्रवार, दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘प्रोजेक्ट डे’ उत्साहात व दिमाखात पार पडला. मराठी राजभाषा गौरव दिनाच्या औचित्याने आयोजित हा उपक्रम ज्ञान, संस्कार व सृजनशीलतेचा प्रभावी संगम ठरला.
इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी “विविधतेत एकता” हा राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावी प्रात्यक्षिकांतून सादर केला. मराठी महिन्यांची ओळख व त्या-त्या महिन्यांनुसार साजरे होणारे सण यांची माहिती त्यांनी आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणातून मांडली. लहान वयातही स्पष्ट उच्चार, अभ्यासपूर्ण मांडणी व सादरीकरणातील निपुणतेमुळे उपस्थित पालक व पाहुणे भारावून गेले.
इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी युनेस्कोप्राप्त किल्ल्यांची माहिती ओजस्वी शब्दांत उलगडली. प्रत्येक किल्ल्याची ऐतिहासिक गाथा जिवंत करताना त्यांनी स्वराज्याच्या पराक्रमाची साक्ष देणारा इतिहास उभा केला. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अद्वितीय कार्याचा संदर्भ देत स्वाभिमान, शौर्य व राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा जागवली.
इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले विज्ञान विषयक लघु प्रयोग हे उपक्रमाचे आणखी एक आकर्षण ठरले. वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कशक्ती व संशोधनवृत्ती यांचे उत्कृष्ट दर्शन घडवत विद्यार्थ्यांनी विविध संकल्पना प्रत्यक्ष प्रयोगांतून स्पष्ट केल्या. पाहुण्यांच्या प्रश्नांना त्यांनी अभ्यासपूर्ण व नेमकी उत्तरे देत आपली तयारी सिद्ध केली.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत विस्तार अधिकारी, पंचायत समिती वाई माननीय श्री. शरद गायकवाड व श्री. राहुल हजारे उपस्थित होते. शाळा समिती सदस्या माननीय सौ. घैसास मॅडम यांचीही उपस्थिती लाभली. प्रशालेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ. विद्या राव यांच्या कुशल नेतृत्वाखाली संपूर्ण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली.
आपल्या मनोगतात मान्यवरांनी शाळेच्या उपक्रमशीलतेचे व विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाचे मनःपूर्वक कौतुक केले. उपस्थित मातांना संबोधित करत त्यांनी राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर घडवलेल्या संस्कारांचा संदर्भ देत, मूल्याधिष्ठित शिक्षणाची आजच्या काळातील गरज अधोरेखित केली. सेवा, समर्पण व प्रामाणिकपणा या गुणांची शिदोरी घेऊन विद्यार्थी आदर्श नागरिक बनावेत, असे प्रेरणादायी आवाहनही त्यांनी केले.
ज्ञानार्जनासोबत संस्कारांची जोड देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची वाटचाल दृढ करणारा हा ‘प्रोजेक्ट डे’ शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची ठळक साक्ष ठरला.













