शैक्षणिक गुणवत्ता, व्यवहारज्ञान व संस्कार घडवण्यात जिल्हा परिषद शाळा आघाडीवर
![]()
वेलंग येथे आसरे केंद्र समूहाचा बाल आनंद मेळावा उत्साहात; विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना व व्यवहारज्ञानाला मिळाले व्यासपीठ
वाई l प्रतिनिधी : “शैक्षणिक गुणवत्तेसोबतच व्यवहारज्ञान, संस्कार व मूल्ये रुजवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य जिल्हा परिषद शाळा करीत आहेत,” असे गौरवोद्गार गटशिक्षणाधिकारी श्री हर्षवर्धन मोरे यांनी वेलंग येथे आयोजित आसरे केंद्र समूहाच्या बाल आनंद मेळाव्याच्या समारोपप्रसंगी काढले. वाईच्या पश्चिम डोंगरदऱ्यातील प्रतिकूल परिस्थितीतही विद्यार्थी जिद्दीने ज्ञानार्जन करीत असून टिकाऊ ज्ञानातून उत्तम नागरिक मराठी शाळांमधून घडत आहेत, याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला.
यावेळी शिक्षण विस्ताराधिकारी श्री दिलीप बाबर यांनी जिल्हा परिषद शाळांचे समाजातील योगदान अधोरेखित करत, बाल आनंद मेळावे हे विद्यार्थ्यांच्या कला-कलागुणांना वाव देणारे तसेच भाजी मंडई व बाल बाजाराच्या माध्यमातून व्यवहारज्ञानाचे प्रत्यक्ष अनुभव देणारे असल्याचे सांगितले. गटशिक्षणाधिकारी श्री हर्षवर्धन मोरे, शिक्षण विस्ताराधिकारी श्री दिलीप बाबर व श्री शकील मोमीन यांच्या हस्ते सर्व शाळांच्या मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांना भिंतीवरील घड्याळे व प्रमाणपत्रे देऊन बक्षीस वितरण करण्यात आले.
सकाळी १०.३० वाजता आसरे केंद्र समूहातील उंबरवाडी, वेलंग, आसरे, रेनावळे, खावली, घेरा केंजळ, पाकीरे वस्ती व ओहळी या आठ जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य श्री विक्रांत भैय्या डोंगरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन झाले. तालुक्यातील सर्व शाळांना आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमात केंद्रातील सुमारे १४ विविध गुणदर्शनाचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. मध्यंतरानंतर विद्यार्थ्यांनी उभारलेल्या बाल बाजाराच्या स्टॉलमधून खरेदी-विक्रीचा प्रत्यक्ष अनुभव घेत आनंद लुटला. रॅम्प वॉक, संगीत खुर्ची, चमचा-लिंबू आदी फनी गेम्सने कार्यक्रमात रंगत वाढली.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन वर्षाराणी कुलकर्णी व सहदेव फणसे यांनी केले. प्रस्तावना केंद्रप्रमुख श्री गजानन वारागडे यांनी केली. नियोजनाबाबत समाधान शिक्षण विस्ताराधिकारी श्री शकील मोमीन यांनी व्यक्त केले. शेवटी सुप्रिया दीक्षित यांनी आभार मानून बाल आनंद मेळाव्याचा समारोप केला.













