खंबाटकी घाटात दरोडेखोरांचा डाव उधळला
![]()
भुईंज पोलिसांची धडक कारवाई; दरोड्याच्या तयारीतील चार सराईत गुन्हेगार जेरबंद, ₹१०.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त
भुईंज | प्रतिनिधी
सातारा–पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वेळे (ता. वाई) येथील खंबाटकी घाटात हायवे लगतच्या पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार सराईत गुन्हेगारांना भुईंज पोलिसांनी सापळा रचून शिताफीने जेरबंद केले. या कारवाईत ₹१० लाख ५२ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून भुईंज पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अमित बजरंग चव्हाण (वय २८, मूळ रा. कुडाळ, ता. जावली, जि. सातारा; सध्या रा. इंदिरानगर, खेड शिवापूर, ता. हवेली, जि. पुणे), सुफियाज मुस्ताफ मुजाहिद (वय ३०, रा. खेड शिवापूर, ता. हवेली, जि. पुणे) आणि सुरज महादेव जाधव (वय १९, रा. शिवाजीनगर, खेड शिवापूर, ता. हवेली, जि. पुणे) यांचा समावेश आहे. यासोबतच एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
भुईंज पोलीस ठाण्याचे सपोनी पृथ्वीराज ताटे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, करुणा मंदिरासमोर पुणे–सातारा हायवेच्या बाजूला एका इरटीगा कारमधून पाच जण पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली होती. ही माहिती तात्काळ सातारा येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्यात आली. वरिष्ठांच्या सूचनेनुसार भुईंज पोलिसांनी साध्या वेशात सापळा रचत रात्री ३.१५ वाजता दरोड्याच्या तयारीतील टोळीला ताब्यात घेतले. मात्र, एक साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला.

झडतीदरम्यान आरोपींकडून दोन कोयते, एक कटावणी, मिरची पूड, तीन मोबाईल फोन आणि इरटीगा कार असा एकूण ₹१०.५२ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी भुईंज पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरू आहे.
ही कारवाई सपोनी पृथ्वीराज ताटे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, सुरज शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे, तसेच पोलीस अंमलदार सुशांत धुमाळ, नितीन जाधव, सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते, किरण निंबाळकर, अजय सकपाळ, अभिजीत वाघमळे यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे (वाई) यांनी भुईंज पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले.
- | आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस
खंबाटकी घाटातील कारवाईनंतर आरोपींकडून मेढा (ता. जावली) परिसरातील डीपी चोरी उघडकीस आली आहे. तसेच घरफोडी व डिझेल चोरीसह आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.













