कुष्ठरोग निर्मुलनामध्ये सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल सातारा जिल्ह्याचा सन्मान
![]()
राज्य शासनाकडून “महाआरोग्य सन्मान २०२६ पुरस्कार
सातारा दि. 24 – राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमामध्ये सन 2025-26 या वर्षात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमामध्ये सातारा जिल्हयाने उल्लेखनीय व उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने “महाआरोग्य सन्मान 2026” पुरस्कार जाहीर केला आहे. दि. 22 फेब्रुवारी 2026 रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर (सार्वजनिक आरोग्य) व सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह आरोग्य सेवा (कुष्ठरोग) चे सहाय्यक संचालक डॉ.राजेश गायकवाड यांना प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हा कुष्ठरोग तसेच सचिव (सार्वजनिक आरोग्य), आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई, संचालक, आरोग्य सेवा (1) मुंबई, संचालक, आरोग्य सेवा (२) पुणे यांच्यासह आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

केंद्र शासनाने व राज्य शासनाने सन 2027 पर्यंत कुष्ठरोगाच्या संसर्गाचे प्रमाण शून्यावर आणण्याचे ध्येय ठेवले आहे. या ध्येयाच्या पुर्ततेसाठी सातारा जिल्हयाने मागील ५ वर्षात सातत्याने जास्तीत जास्त नविन कुष्ठरुग्ण शोधून व त्यांना बहुविध औषधोपचाराखाली आणून रोगमुक्त केले तसेच त्यांचेमार्फत होणा़-या संसर्गाची साखळी खंडीत केली आहे. तसेच शोधल्या जाणा-या सर्व नविन कुष्ठरुग्णांच्या सहवासितांना एक डोस कॅप्सूल रिफॅम्पीसीनचा देऊन त्यांचा कुष्ठरोगाचा संसर्ग होण्यापासून बचाव केला आहे.
मागील ५ वर्षात सातारा जिल्ह्याला सलग ४ वर्ष सर्वोत्कृष्ट काम केल्याचा पुरस्कार मिळत आहे ही बाब निश्चितच भूषणावह असल्याचे सांगून जिल्हाधिकारी संतोष पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी सातारा जिल्हा कुष्ठरोग निर्मूलन टीमचे अभिनंदन केले.
सातारा जिल्हयातील आरोग्य विभागातील सर्व वरिष्ठ आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांच्या सांघिक यशस्वी कार्यामुळे ही अभिमानास्पद कामगिरी साध्य करता आली असल्याचे मत डॉ. राजेश गायकवाड यांनी व्यक्त केली.













