सेवाकार्य व आचरणातून रोखठोक प्रबोधन करणारे संत गाडगे महाराज समाजाचे विश्वस्त – प्रा. श्रीधर साळुंखे
![]()
राष्ट्रसंत संत गाडगे बाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त साताऱ्यात व्याख्यान, गौरव सोहळा, रक्तदान व स्वच्छता अभियान
भुईंज (सातारा) : जीवनात शिक्षणाचे महत्त्व, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती याबाबत कठोर प्रबोधन करणारे संत गाडगे महाराज हे मानवतेचे पुजारी व समाजाचे खरे विश्वस्त होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. श्रीधर साळुंखे यांनी केले. ते कामाठीपुरा, सातारा येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त संत गाडगेबाबा समाज सेवा संस्था, सातारा व जिल्हा लॉंड्री संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक कल्याण राक्षे तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ मार्गदर्शक भिकू राक्षे उपस्थित होते.
प्रा. साळुंखे पुढे म्हणाले की, मानवसेवा हीच माधवसेवा मानून दवाखाने, धर्मशाळा व अन्नछत्रे चालविणारे गाडगे बाबा हे द्रष्टे व कृतीशील समाजसेवक होते. अखिल मानवजातीसाठी कार्य करणाऱ्या संतांना जातीच्या चौकटीत बंदिस्त करणे म्हणजे त्यांच्या आकाशाएवढ्या कार्यकर्तृत्वाला खुजे करण्यासारखे आहे. बाबांनी सेवेसाठी सांगितलेली दशसूत्री ही मानवोद्धाराची आचारसंहिताच आहे. निष्काम कर्मयोग, निरपेक्ष सेवाधर्म आणि चारित्र्यसंपन्न निर्व्यसनी जीवन अंगीकारणे हीच त्यांच्या जीवनकार्याला खरी मानवंदना ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी नुकत्याच झालेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत विजयी झालेल्या समाजातील नवनिर्वाचित सदस्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच आदर्श पोलीस पाटील प्रवीण राक्षे, आदर्श एस.टी. महामंडळ अधिकारी अशोकराव कोकाटे आणि आदर्श मार्केट कमिटी अधिकारी चेतन पिसाळ यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष दिलीपराव काटकर, जिल्हा लॉंड्री संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत शेडगे व महेश सुळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रस्ताविक उपाध्यक्ष सौ. माणिक हजारे यांनी मांडले. सूत्रसंचालन प्रा. बाळासाहेब काटकर यांनी केले तर आभार पत्रकार जयवंत पिसाळ यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्येष्ठ मार्गदर्शक अरविंद शेडगे, सरचिटणीस हणमंतराव साळुंखे, उपाध्यक्ष अरविंद राक्षे, वसंतराव गहिने व संतोष राक्षे यांनी परिश्रम घेतले.
संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. समाजबांधव व तरुण वर्गाच्या सहभागातून तब्बल १५० रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या. तसेच जिल्हाभरात १५० ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून कृतीतून जयंती साजरी करण्यात आली, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष दिलीप काटकर यांनी दिली.













