Tue, Feb 24, 2026
सातारा जिल्हा

स्वच्छ साताऱ्यासाठी नऊ एमआरएफ सेंटर उभारणी; घनकचरा व्यवस्थापनाचे आदर्श मॉडेल साकारण्याचा निर्धार

स्वच्छ साताऱ्यासाठी नऊ एमआरएफ सेंटर उभारणी; घनकचरा व्यवस्थापनाचे आदर्श मॉडेल साकारण्याचा निर्धार
Ashok Ithape
  • PublishedFebruary 22, 2026

तालुकास्तरीय प्रकल्पांतून कचऱ्याचे ‘बिझनेस मॉडेल’; घराघरांत कचरा वर्गीकरण जनजागृतीचे आवाहन

सातारा : स्वच्छ व पर्यावरणपूरक सातारा जिल्हा घडविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत जिल्ह्यातील नऊ ठिकाणी एमआरएफ (Material Recovery Facility) सेंटर उभारण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषद साताराच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिली.
सातारा जिल्हा परिषदच्या स्थायी सभागृहात तालुकास्तरीय एमआरएफ व प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्पांच्या कार्यान्वयन व संचालनाबाबत आयोजित मार्गदर्शन बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, विस्ताराधिकारी, बीआरसी, गटविकास अधिकारी व उपअभियंते उपस्थित होते.

या बैठकीत नेहरू फाउंडेशन फॉर डेव्हलपमेंटच्या सेंटर फॉर एनव्हायर्नमेंट एज्युकेशन (CEE), दिल्लीचे वरिष्ठ कार्यक्रम संचालक प्रभज्योत सोधी, प्रकल्प संचालक विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, कार्यकारी अभियंता गौरव चक्के, खंडाळाचे गटविकास अधिकारी अनिल वाघमारे व कराडचे गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील उपस्थित होते.

याशनी नागराजन यांनी सांगितले की, तालुकास्तरीय घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांमधून उत्कृष्ट ‘बिझनेस मॉडेल’ विकसित करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या यशासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत कुटुंब पातळीवर कचरा वर्गीकरणाबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय साधून काम केल्यास सातारा जिल्ह्याचे घनकचरा व्यवस्थापनाचे आदर्श मॉडेल उभे राहील, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी मार्गदर्शन करताना प्रभज्योत सोधी यांनी सांगितले की, ओला कचरा दररोज व सुका कचरा तीन दिवसांतून एकदा संकलित करावा. ओला व सुका कचऱ्यासाठी स्वतंत्र वाहने असावीत. तसेच दररोज १०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांनी स्वतःच्या कचऱ्याचे व्यवस्थापन स्वतः करणे बंधनकारक राहील.

प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी यांत्रिकीकरण व आधुनिक तंत्रज्ञानाधारित व्यवसाय मॉडेल विकसित करण्यात येणार असून, शिरवळ येथे एमआरएफ सेंटरची उभारणी पूर्ण झाली आहे. त्यासाठी CEE संस्थेमार्फत आवश्यक मार्गदर्शन देण्यात आले असून, जिल्ह्यातील इतर प्रकल्पांनाही अशाच पद्धतीने मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सातारा जिल्हा स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर असून, एकत्रित प्रयत्नांतून स्वच्छतेचे आदर्श मॉडेल निर्माण होऊ शकते, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

तालुकास्तरीय प्लास्टिक केंद्रासाठी निवड करण्यात आलेल्या मल्हार पेठ, तरडगाव, पाचवड, पुसेगाव, वाठार स्टेशन, मंदृळकोळे, वर्णे, पांगरी व मसूर या ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, संबंधित तालुक्यांचे विस्तार अधिकारी, बीआरसी, तसेच CEE चे जिल्हा समन्वयक आकाश गायकवाड व पाणी व स्वच्छता विभागाचे जिल्हा तज्ञ उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!