Wed, Feb 25, 2026
कृषी वार्ता

वेलंगचा जंगी जनावर बाजार सज्ज!

वेलंगचा जंगी जनावर बाजार सज्ज!
Ashok Ithape
  • PublishedFebruary 20, 2026

२१ फेब्रुवारीपासून बैल बाजाराचा थाट; २८ फेब्रुवारीला दिमाखदार बक्षीस समारंभ

वाई : परंपरेचा वारसा जपत, संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेला वेलंग येथील वार्षिक जनावरांचा जंगी बाजार यंदाही उत्साहात भरविण्यात येणार आहे. वाई शेती उत्पन्न बाजार समिती यांच्या पुढाकाराने मौजे वेलंग (ता. वाई, जि. सातारा) येथे दि. २१ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत नऊ दिवसांचा भव्य बैल बाजार रंगणार आहे.

या बाजारासाठी सातारा जिल्ह्यासह भोर, पुणे, सांगली, कोल्हापूर, कर्नाटक, अहिल्यानगर आदी भागांतून शेतकरी व व्यापाऱ्यांची मोठी गर्दी अपेक्षित आहे. उत्कृष्ट आणि नामांकित जनावरांची खरेदी-विक्री होत असल्याने लाखोंची आर्थिक उलाढाल या बाजाराचे वैशिष्ट्य ठरते.

बाजारानिमित्त जनावरे व नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, दिवाबत्ती, स्वच्छता आणि सुरक्षिततेची विशेष व्यवस्था समितीमार्फत तसेच वेलंग ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने करण्यात आली आहे. बाजार परिसरात सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जाणार असल्याची माहिती सभापती मोहन जाधव व सचिव महेंद्र खांडे यांनी दिली.

या बाजारातील उत्कृष्ट जनावरांची निवड करून त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार असून, दि. २८ फेब्रुवारी रोजी दुपारी १ ते ४ या वेळेत बक्षीस समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी असून, सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे वाई शेती उत्पन्न बाजार समिती व वेलंग ग्रामपंचायत यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!