Wed, Feb 25, 2026
महाराष्ट्र

दादा गेले! आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण

दादा गेले! आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण
Ashok Ithape
  • PublishedJanuary 28, 2026

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन:
तीन दिवसाचा दुखवटा

  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शोकमग्न श्रद्धांजली
  • पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी वाहिली उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. २८:- जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, माझे मित्र आणि सहकारी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी आहे. मनाला चटका लावणारी आहे. मन सुन्न झाले आहे. भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, अशा शोकमग्न भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांना शोकमग्न श्रद्धांजली अर्पण केली आहे.

‘माझा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे. माझ्यासाठी ही वैयक्तिक हानी आहे. हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण आहे.
मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या अपघातात अन्य ४ जणांचा मृत्यू झाला. त्यांच्याही कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे नमूद करून मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना तीव्र दुःख

महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या अकाली निधनामुळे तीव्र दुःख झाले. दिवंगत श्री अजित पवार यांच्या आत्म्यास ईश्वर सद्गती देवो व पवार यांच्या कुटुंबीयांना, सहकाऱ्यांना आणि असंख्य समर्थकांना हा दुखद प्रसंग सहन करण्याचे धैर्य प्रदान करो, ही प्रार्थना करतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी वाहिली उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली

सातारा दि. 28 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन झाले. यावर विश्वास बसत नसून ही घटना मनाला धक्का देणारी आहे, अशा भावना व्यक्त करुन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली.
स्पष्टवक्ता, नियमात बसणाऱ्या गोष्टी करणारा नेता म्हणून उपमुख्यमंत्री श्री. पवार यांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख होती. मी अडची वर्ष वित्त विभागाचा राज्यमंत्री असताना त्यांच्या सोबत अनेक बैठका होत होत्या. अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी महाराष्ट्रातील सर्व घटकांना न्याय देता आला पाहिजे ही त्यांची भूमिका राहील आहे.
शंभूराज देसाई म्हणाले, माझी व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राजकरणापलीकडची मैत्री होती. त्यांच्या जाण्याने अत्यंत दुख झाले असून पाटण विधानसभा मतदार संघाचा आमदार व सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून श्री. देसाई यांनी श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन:
तीन दिवसाचा दुखवटा

सातारा दि. २८ : महाराष्ट्र राज्याचे  उपमुख्यमंत्री श्री. अजित आशाताई अनंतराव पवार यांचे आज दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या सन्मानार्थ राज्यात तीन दिवसांचा राज्य दुखवटा पाळला जाईल, असे राज्य शासनातर्फे निर्देशित करण्यात आले आहे.

शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडील आदेशानुसार दिवंगत मान्यवरांच्या सन्मानार्थ खालीलप्रमाणे सूचनांचे पालन करण्यात यावे. असे शासनाने निर्देशित केले आहे.

आज बुधवार, दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी संपूर्ण जिल्ह्यातील राज्य शासनाची सर्व कार्यालये बंद राहतील.

दिनांक 28 ते 30 जानेवारी  2026पर्यंत सर्व शासकीय इमारतीवरील राष्ट्रध्वज अर्ध्या काठीवर (Half Mast) फडकविण्यात यावा.

राज्यात तीन दिवसांचा राज्य दुखवटा पाळला जाईल व या काळात कोणतेही अधिकृत शासकीय करमणुकीचे कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत. अशा सूचना राज्य शासनातर्फे देण्यात आलेल्या आहेत. यांचे काटकोन पालन जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!