अपघातात मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या तीन चालकांविरोधात गुन्हे दाखल
![]()
संबंधित वाहने जप्त; भुईंज पोलिसांची ठोस कारवाई
भुईंज : वाई तालुक्यात वेगवेगळ्या तीन रस्ते अपघातांमध्ये नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढणाऱ्या तीन वाहनचालकांविरोधात भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून संबंधित वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.
या प्रकरणी कुलदीप तानाजी कवडे (रा. कराड), कृष्णाकांत ससाने (रा. सेदापूर, ता. जि. बीड) आणि संजय विठ्ठल चव्हाण (रा. निंबळक, ता. फलटण) यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिला अपघात दि. १८ डिसेंबर २०२४ रोजी घडला होता. वाहनाच्या धडकेत पादचारी अरुण पवार (रा. वेळे, ता. वाई) यांचा मृत्यू झाला.
दुसरा अपघात दि. २४ डिसेंबर २०२४ रोजी वाई–पाचवड रस्त्यावर झाला. यात दुचाकीस्वार दीपक शिवाजी निकम (रा. जाब, ता. कोरेगाव, जि. सातारा) यांना धडक बसून त्यांचा मृत्यू झाला.
तिसरा अपघात दि. ६ जानेवारी २०२५ रोजी असले गावच्या हद्दीत झाला. या अपघातात जखमी झालेले संजय कुंडलिक रिते (रा. इसम, ता. फलटण, जि. सातारा) यांच्या अंगावरून वाहन गेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.
सर्व प्रकरणांमध्ये वाहनांचे ट्रॅक रेकॉर्ड, सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास करून संबंधित वाहने शोधून जप्त केली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ही कारवाई भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, सुरेश शिंदे, पोलीस अंमलदार दत्तात्रय शिंदे, आप्पा कोलवडकर, नितीन जाधव, सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते, किरण निंबाळकर यांच्या पथकाने केली.
अपघातानंतर पळ काढू नका – भुईंज पोलिसांचे आवाहन
दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत असून, भुईंज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग व ग्रामीण भागात अपघात झाल्यास घटनास्थळावरून पळ काढू नये, असे जाहीर आवाहन भुईंज पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
अपघातग्रस्त जखमींना तात्काळ उपचार मिळवून देणे हे कायद्याने बंधनकारक असून अपघात करून पळून जाणे हा गंभीर व दंडनीय गुन्हा आहे. अशा प्रकरणांमध्ये संबंधित वाहनचालकांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिला आहे.
नागरिकांनी व वाहनचालकांनी अपघाताची माहिती त्वरित ११२ किंवा जवळच्या पोलीस ठाण्याला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.













