Wed, Feb 25, 2026
सामाजिक

रस्ते अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन गरजेचे – विनय मोरे

रस्ते अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन गरजेचे – विनय मोरे
Ashok Ithape
  • PublishedJanuary 24, 2026

किसनवीर महाविद्यालयात रस्ता सुरक्षा मोहिमेत तज्ज्ञांचे मार्गदर्शन; विद्यार्थ्यांना हेल्मेटचे वाटप

वाई : देशात दर मिनिटाला पाच तर दरवर्षी सुमारे एक लाख ८० हजार नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू होत आहे. वाहनांचा वेग माणसाला मृत्यूकडे घेऊन जात असून या अपघातांमुळे राष्ट्रीय संपत्तीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ही गंभीर स्थिती टाळण्यासाठी प्रत्येकाने रस्ते वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन सारथी सुरक्षा सेवा संस्थेचे सचिव विनय मोरे यांनी केले.

एनसीसी, एनएसएस व विद्यार्थी कल्याण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने किसनवीर महाविद्यालयात आयोजित रस्ता सुरक्षा मोहिमेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे होते. यावेळी सातारा आरटीओ अधिकारी सचिन बिसले, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा रुपाली मोरे, रेखा चिरगुटे, सचिव पिंकी जैन, उपप्राचार्य विनोद वीर, सामाजिक कार्यकर्ते नाना मोरे तसेच पत्रकार उपस्थित होते.
विनय मोरे यांनी मार्गदर्शन करताना सीटबेल्ट व हेल्मेटचा वापर, वेगमर्यादेचे पालन, रस्त्यावरील सूचना व सिग्नल्सचे पालन, रात्रीचा अनावश्यक प्रवास टाळणे, गरज असल्यासच फॉग लाईट्सचा वापर, तसेच रस्ता दुरुस्तीवेळी बॅरिकेट्स लावण्याचे महत्त्व स्पष्ट केले. अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या नागरिकांना शासनाकडून २५ हजार रुपयांची मदत व अपघातग्रस्त व्यक्तीस १ लाख ५० हजार रुपयांचे विमा कवच मिळते, याची माहितीही त्यांनी दिली.

आरटीओ अधिकारी सचिन बिसले यांनी दुचाकीस्वारांनी आयएसओ मानांकित हेल्मेट वापरणे बंधनकारक असल्याचे सांगत अल्पवयीनांनी वाहन चालवू नये, असे आवाहन केले.

पत्रकार विठ्ठल माने यांनी रस्ते वाहतूक हा केवळ नियमांचा विषय नसून तो जीवन सुरक्षेचा प्रश्न असल्याचे नमूद केले.
प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी असे कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी दिशादर्शक ठरतात, असे सांगितले. कार्यक्रमाची प्रस्तावना मेजर डॉ. समीर पवार यांनी केली, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. राजेंद्र जयकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन एनसीसी विद्यार्थिनी वृषाली शिंदे हिने केले व आभार डॉ. भीमाशंकर बिराजदार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अमोल कवडे, प्रा. सुरज यादव, दत्ता काळे व एनसीसी कॅडेट्स यांनी विशेष परिश्रम घेतले.

विद्यार्थ्यांना हेल्मेटचे वाटप : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागृती निर्माण करण्यासाठी इनरव्हील क्लबच्या वतीने ५० हेल्मेटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी सुरक्षित वाहन चालविण्याची शपथ घेतली.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!