26 जानेवारीच्या ग्रामसभेत गावच्या सांस्कृतिक वारशाला उजाळा — याशनी नागराजन, भा.प्र.से.
सातारा : पंचायत राज मंत्रालय, भारत सरकार व सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील सर्व गावांचा सांस्कृतिक वारसा डिजिटल स्वरूपात जतन करण्यासाठी “मेरा गाव मेरी धरोहर” हे राष्ट्रीय अभियान राबविले जात आहे. या उपक्रमांतर्गत गावोगावी असलेला मूर्त व अमूर्त सांस्कृतिक ठेवा संकलित करून तो https://mgmd.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या अभियानात गावाचे सांस्कृतिक महत्त्व, ऐतिहासिक व पुरातत्त्वीय स्थळे, नैसर्गिक प्रार्थनास्थळे, सण-उत्सव, मेळे-यात्रा, लोककला, लोकसंगीत-नृत्य, पारंपरिक हस्तकला, पारंपरिक ज्ञान, पाककला वारसा, तसेच लोककलावंत, कारागीर, शिल्पकार, वादक आणि सांस्कृतिक संस्था यांची सविस्तर माहिती संकलित केली जाणार आहे. यासोबतच पारंपरिक वस्तू, कलाकृती आणि ग्रामपंचायतीच्या सांस्कृतिक तपशीलांचेही दस्तऐवजीकरण करण्यात येणार आहे.
गावपातळीवर या सर्वेक्षणाची जबाबदारी ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. दिनांक 20 ते 24 जानेवारी 2026 या कालावधीत ग्रामस्थांच्या सहकार्याने सहभागी ग्रामीण मुल्यांकन (PRA) पद्धतीने सर्वेक्षण पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर 26 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या ग्रामसभेत सर्वेक्षणातून संकलित केलेल्या सांस्कृतिक घटकांची माहिती वाचून ग्रामस्थांच्या सूचनांचा समावेश करण्यात येईल. ग्रामसभेची मान्यता घेतल्यानंतर ही माहिती “मेरा गाव मेरी धरोहर” संकेतस्थळावर अपलोड केली जाणार आहे. सदर माहितीचे प्रमाणीकरण पंचायत समिती पातळीवर गटविकास अधिकारी यांच्याकडून करण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी व संगणक परिचालक यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.
गावच्या सर्व सांस्कृतिक घटकांचे डिजिटल दस्तऐवजीकरण झाल्याने प्रत्येक गावचा अनोखा सांस्कृतिक वारसा जगासमोर येणार असून, तो जतन व संवर्धन करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.













