“बावधनमध्ये भाजपचे शक्तिप्रदर्शन; जिल्हा परिषद रणशिंग फुंकले”
![]()
बावधन येथे भाजपचा भव्य पक्षप्रवेश; जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीत परिवर्तनाची हाक
वाई, दि. १८ : बावधन गाव हे सातत्याने राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले असून, या गावाच्या निर्णयाने काय घडू शकते हे वाई नगरपालिकेच्या निवडणुकीत आपण पाहिले आहे. वाई नगरपालिका ही केवळ झाकी होती, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा सामना अजून बाकी आहे, असा ठाम इशारा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिला.
भारतीय जनता पक्षात वाई–खंडाळा–महाबळेश्वर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा भव्य जाहीर प्रवेश बावधन येथे संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास माजी आमदार मदनदादा भोसले, धैर्यशील कदम, सुनील काटकर, चिन्मय कुलकर्णी, नगराध्यक्ष अनिल सावंत, सचिन भोसले, दिपक ननावरे, डी. एम. बावळेकर, रोहिदास पिसाळ, काशिनाथ शेलार, प्रसाद सुर्वे, दिलीप बाबर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मंत्री जयकुमार गोरे पुढे म्हणाले की, वाई तालुक्याचे राजकारण गेली अनेक वर्षे राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिले आहे. या तालुक्यात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असते. याच भूमीवर धाडसी निर्णय घेतले गेले असून, त्या निर्णयांनी राजकीय इतिहास घडवला आहे. वाई नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या विजयात शशिकांत पिसाळ यांचा मोलाचा वाटा आहे. पिसाळ कुटुंबाने सुरुवातीपासून घेतलेली भूमिका ही परिवर्तनाची नांदी ठरली, हे विसरता येणार नाही.
२०१४ पासून देशात आणि राज्यात भाजपची लाट सुरू असून, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्याला विकासाची नवी दिशा मिळाली. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य आणि शिक्षण अशा मूलभूत सुविधांमध्ये मोठा बदल जनतेने अनुभवला आहे. त्यामुळेच जनता सातत्याने भाजपच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, असे त्यांनी नमूद केले.
या जिल्ह्याने शरद पवार यांच्यावर मोठे प्रेम केले, जिल्हा परिषद, जिल्हा बँक आणि सहकारी संस्थांमध्ये त्यांना ताकद दिली. मात्र जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी नेमके काय दिले, याचे ठोस उत्तर आजही मिळत नाही, असा सवालही मंत्री गोरे यांनी उपस्थित केला. याउलट देवेंद्र फडणवीस यांच्या काळात या भागात झालेली विकासकामे जनतेने प्रत्यक्ष पाहिली आहेत, असे ते म्हणाले.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जवळ आल्याने, ही परिवर्तनाची मोठी संधी असल्याचे सांगत, खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या, जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणाऱ्या उमेदवारालाच पुढे आणण्याचे आवाहन त्यांनी केले.
माजी आमदार मदनदादा भोसले म्हणाले की, आगामी काळात सर्वांनी एकदिलाने काम करून पक्ष अधिक बळकट केला जाईल. पिसाळ कुटुंबासह भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता एकसंघपणे काम करेल.
यावेळी शशिकांत पिसाळ, माजी सभापती अरुणादेवी पिसाळ, विजयसिंह पिसाळ, दिप्ती पिसाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप बाबर, खंडाळा सभापती एस. वाय. पवार, लोकनेते बापूसाहेब शिंदे, बावधनच्या विद्यमान सरपंच वंदना कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंकीता कदम यांनी केले. सुनील कदम यांनी स्वागत केले, तर चंद्रकांत कोकाटे यांनी सूत्रसंचलन केले. कार्यक्रमास वाई, खंडाळा, महाबळेश्वर परिसरातील भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“सातारा जिल्ह्यातील धरणांचे पाणी बाहेरच्या जिल्ह्यांना दिले गेले; पण याच तालुक्यातील आणि जिल्ह्यातील जनतेला ते का मिळाले नाही? आम्ही दुष्काळी भागात पाणी नेण्यासाठी संघर्ष केला, मग तुम्हाला ते का जमले नाही?”
— मंत्री जयकुमार गोरे













