बावधन–शेंदुरजणे गणात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद दुप्पट
![]()
युवा नेते विराज शिंदे, माजी पं.स. सदस्या रुतुजा शिंदे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटात जाहीर प्रवेश.
वाई : वाई तालुक्यातील राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या घडामोडीत बावधन–शेंदुरजणे गणातील युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा युवा नेते विराज शिंदे आणि माजी पंचायत समिती सदस्या सौ. रुतुजा शिंदे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे बावधन जिल्हा परिषद गट व शेंदुरजणे गणात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे.
किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर हा प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. व्यासपीठावर प्रमोद शिंदे, मोहन जाधव, प्रताप पवार, मदन भोसले, किरण काळोखे, अरविंद कुदळे, शंकरआप्पा शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रवेशावेळी बोलताना विराज शिंदे म्हणाले, “हा निर्णय वैयक्तिक राजकारणासाठी नसून बावधन व शेंदुरजणे भागाच्या स्वाभिमानासाठी घेतला आहे. मतभेद विसरून एकोप्याने विकासासाठी काम करण्याचा निर्धार केला आहे. लहानपणापासून काँग्रेस विचारांमध्ये वाढलो असलो तरी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी झाल्याने नवी ऊर्जा मिळाली आहे. विचार न पटल्याने भाजपात जाण्याचा प्रस्ताव नाकारला. यापुढे युवकांची मजबूत फळी उभी करून पक्षसंघटना बळकट करणार आहे.”
यावेळी उपस्थित मान्यवरांनीही हा तालुक्याच्या राजकारणातील ऐतिहासिक क्षण असल्याचे नमूद केले. “विराज शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांची घरवापसी म्हणजे ‘सुबह का भुला शाम घर आया’ यासारखी आहे. यशवंतराव चव्हाण व शरद पवार यांच्या विचारांवर विश्वास ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सन्मान राखला जाईल,” असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
सौ. रुतुजा शिंदे म्हणाल्या, “समविचारी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पंचायत समितीमध्ये जनहिताची कामे केली असून यापुढे अधिक ताकदीने पक्षाचे काम करणार आहे.”
मोहन जाधव यांनी सांगितले की, प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आला असून सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या प्रवेशामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अधिक सक्षम झाल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमात मेघराज शिंदे, सोसायटी चेअरमन प्रकाश मारुती शिंदे, माजी सरपंच रामदास खामकर, अतुल जाधव, नितीन मांढरे, विशाल मांढरे, गणेश जाधव, आनंद मांढरे, अविनाश गाढवे, मयूर गाढवे, प्रकाश एरंडे, शांताराम शिंदे, अजिंक्य शिंदे, अनिल कांबळे, सचिन चव्हाण, योगेश देशमाने, योगेश महांगडे, नारायण महांगडे, शिवाजी कांबळे, राजू शिंदे पाटील, मोहन महांगडे, विनय शिंदे, ज्ञानेश्वर पवार, विशाल महांगडे, नरेंद्र माऊली शिंदे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन दिलीप पिसाळ यांनी केले, तर मदन भोसले यांनी आभार मानले. बावधन जिल्हा परिषद गट, शेंदुरजणे गण व बावधन गणातील असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.













