Thu, Jan 15, 2026
सातारा जिल्हा

निष्पक्षपातीपणे काम करुन निवडणुका सुरळीत पार पाडा – जिल्हाधिकारी संतोष पाटील

निष्पक्षपातीपणे काम करुन निवडणुका सुरळीत पार पाडा – जिल्हाधिकारी संतोष पाटील
Ashok Ithape
  • PublishedJanuary 14, 2026

सातारा दि. 14 : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पादर्शक, भयमुक्त व निष्पक्ष वातावरणात पार पाडावी. यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. आचार संहितेच्या कालावधीत सर्व शासकीय अधिकारीव कर्मचारी यांची वर्तणुक निष्पक्ष असेल याची प्रत्येकाने काटेकोरपणे दक्षता घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत पक्षपाती वर्तणुकीची तक्रार खपवून घेतली जाणार नाही, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुक तयारी, आदर्श आचारसंहिता व कायदा सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीबाबत आढावा घेण्यात आला. या आढावा बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभय काटकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विविध यंत्रणांवर जबाबदारी देण्यात आली आहे ही जबाबदारी पारदर्शकपणे पार पाडावी, असे निर्देश देऊन जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, निवडणूक कालावधीमध्ये आपण राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी, कर्मचारी म्हणून काम करीत असतो याचे भान ठेवून प्रत्येकाने आपली जबाबदारी जबादारीने पार पाडावी. प्रत्येकाच्या हातात कॅमेरे आल्याने कोणतीही चुक लपून राहत नाही तसेच ती तात्काळ लोखो लोकांपर्यंत पोहचते, मुळे कामकाज करत असताना चुका टाळाव्यात. तसेच निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना समान संधी उपलब्ध करुन द्यावी. ज्या ठिकाणी अवैध प्रकार आढळल्यास तात्काळ कारवाई करा.

विविध परवान्यांसाठी एक खिडकी योजना आजच सुरु करावी. स्थिर व फिरते पथकांची नियुक्ती करावी, असे निर्देश देऊन जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, जिल्हा परिषदेकडील अधिनस्त इमारतींवरील राजकीय पक्षांचे प्रमुखांची छायाचित्रे, बॅनर, साहित्य काढून घ्यावे. त्यांचे ऑडीट जिल्हा परिषदेकडील बांधकाम विभागामार्फत करुन प्रमाणीत करुन घ्यावे व त्याचा अहवाल निवडणूक आयोगाला द्यावा.

नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी गर्दी होते. यातून वादाचे प्रकारासह तक्रारी होतात, यासाठी निवडणूक कार्यालयाची जागा प्रशस्त निवडावी व या प्रक्रियेचे चित्रीकरण करावे. राजकीय पक्षाचे पदाधिकारी शासकीय वाहने वापरतात ते ताबडतोब जमा करण्याचे आदेश पोलीस विभागाने द्यावेत. त्याचबरोबर ज्यांच्याकडे शस्त्र परवाना दिलेला आहे त्यांच्याकडील शस्त्रे जमा करुन घ्यावीत, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिले. मत मोजणीच्या ठिकाणांची संयुक्त तपासणी करावी. तडीपारीचे प्रतिबंधात्मक आदेश काढताना काळजी घ्यावी. असेही निर्देश त्यांनी दिले.

यावेळी पोलीस अधीक्षक श्री. दोशी म्हणाले, निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्तासाठी मुष्यबळाची मागणी तातडीने करावी. तसेच प्रतिबंधात्मक आदेश तातडीने काढले जातील. स्थिर व फिरते पथकासाठी पोलीस व होमगार्ड दिले जातील. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी समन्वय ठेवूया असेही त्यांनी सांगितले.

उपजिल्हाधिकारी (महसूल) श्री. चव्हाण यांनी आदर्श आचार संहितेत काय करावे व काय करु नये याबाबतची तसेच यंत्रणांच्या जबाबदाऱ्या विविध परिस्थितीत वापरण्यात येणारे कायदेशीर तरतुदींची, विविध समित्या यांची सविस्तर माहिती या बैठकीला सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!