३३ व्या ज्युनियर राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत महेश तेलतुंबडेची दमदार कामगिरी
![]()
ईपी प्रकारात सिल्व्हर मेडल पटकावत राज्याचा नावलौकिक
वाई l प्रतिनिधी : कटक (ओरिसा) येथे दिनांक ०५ जानेवारी २०२५ ते १० जानेवारी २०२५ या कालावधीत ३३ वी ज्युनियर राष्ट्रीय तलवारबाजी (फेन्सिंग) चॅम्पियनशिप मोठ्या उत्साहात पार पडत आहे. देशभरातून सहभागी झालेल्या नामवंत खेळाडूंमध्ये ईपी (Epee) प्रकारात महेश रवींद्र तेलतुंबडे याने अत्यंत संयमी, वेगवान व तांत्रिक खेळाचे प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक मिळवून सिल्व्हर मेडल पटकावले असून, त्याने राज्याचा नावलौकिक वाढवला आहे.
स्पर्धेच्या प्रत्येक फेरीत महेशने आत्मविश्वास, अचूकता आणि रणनीतीचा उत्कृष्ट संगम दाखवत अनेक बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. अंतिम फेरीपर्यंतची त्याची यशस्वी वाटचाल ही त्याच्या कठोर परिश्रमांची, सातत्यपूर्ण सरावाची आणि जिद्दीची साक्ष देणारी ठरली.
महेश हा शालेय स्तरापासूनच राष्ट्रीय पातळीपर्यंत सातत्याने चमकदार कामगिरी करत आहे. त्याने ज्युनिअर स्टेट स्पर्धेमध्ये तीन सुवर्णपदके, तर सीनियर स्टेट स्पर्धेमध्ये तीन कांस्यपदके पटकावली आहेत. तसेच खेलो इंडिया टूर्नामेंटमध्ये त्याने अव्वल कामगिरी करत स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली आहे.
महेशच्या या यशामागे त्याचे मुख्य प्रशिक्षक प्रफुल्ल जगताप सर यांचे मोलाचे योगदान आहे. महेशमधील कौशल्य, शिस्त, सातत्य आणि भविष्यातील अपार शक्यता पाहता प्रशिक्षक प्रफुल्ल जगताप सर यांना त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यांनी महेशचे मनापासून कौतुक करत, “महेशमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करण्याची पूर्ण क्षमता आहे,” असा विश्वास व्यक्त केला आहे.
तसेच उदय डोंगरे सर, अशोक दुधारे सर, काठोळे सर, सागर मगरे सर यांच्या मार्गदर्शनाचा त्याला मोठा लाभ झाला आहे.
महेशच्या क्रीडा यशामागे त्याचे वडील श्री. रवींद्र तेलतुंबडे, जे पोलीस खात्यामध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, यांचा शिस्तबद्ध जीवनशैलीचा व कर्तव्यनिष्ठेचा मोठा प्रभाव आहे. वडिलांकडून मिळालेल्या संस्कारांमुळेच महेशमध्ये कठोर मेहनत, संयम व जिद्द रुजली आहे.
विशेष म्हणजे, खेळामध्ये अव्वल असलेला महेश अभ्यासातही तितकाच प्राविण्य मिळवत आहे. त्याची बहीण समृद्धी तेलतुंबडे ही सुद्धा एक गुणवंत व अव्वल खेळाडू असून, संपूर्ण कुटुंबच क्रीडाक्षेत्रात आदर्श ठरत आहे.
भविष्यात आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होऊन देशासाठी पदक जिंकणे हे महेशचे मोठे स्वप्न असून, त्याच्या आजपर्यंतच्या कामगिरीवरून ते स्वप्न निश्चितच साकार होईल, असा विश्वास क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे.
महेश तेलतुंबडे यांच्या या अभिमानास्पद यशाबद्दल क्रीडाप्रेमी, प्रशिक्षक, मित्रपरिवार तसेच विविध क्रीडा संघटनांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्याच्या पुढील उज्ज्वल क्रीडा वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.













