आळंदी नगरपरिषदेच्या वतीने मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा
आळंदी l प्रतिनिधी : ६ जानेवारी रोजी साजरा होणारा मराठी पत्रकार दिन (दर्पण दिन)आळंदी नगरपरिषदेच्या वतीने सन्मानपूर्वक आणि उत्साहात साजरा करण्यात आला. मराठीतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ सुरू करणारे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमास नगरपरिषदेचे अधिकारी,कर्मचारी,नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांना शाल,श्रीफळ,पुष्प व पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात बोलताना मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले की,आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी सतीप्रथा,बालविवाह,जातीय भेदभाव यांसारख्या सामाजिक अनिष्ट रूढींविरोधात आपल्या लेखनातून आवाज उठवला. समाज परिवर्तनासाठी त्यांनी लावलेले रोप आज वटवृक्षाच्या रूपाने उभे आहे.त्यांना अनेक भाषांचे सखोल ज्ञान होते, असेही त्यांनी नमूद केले.
पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असून,पत्रकार समाजातील घडामोडी,प्रश्न आणि समस्या जनतेपर्यंत तसेच प्रशासन व सत्तेपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य करतात,असेही मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले.याच अनुषंगाने नगरपरिषदेच्या वेटिंग एरियामध्ये नागरिकांसाठी वाचनासाठी पुस्तके उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.तसेच बुके ऐवजी पुस्तक भेट देण्याचा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे सांगत,पुस्तके विचारांना चालना देतात व आयुष्याला योग्य दिशा देतात,असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनीही पत्रकारितेच्या भूमिकेवर भाष्य करताना सांगितले की,पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील प्रश्न,विकासात्मक बाबी सातत्याने मांडण्याचे काम पत्रकार करत असतात. आळंदीच्या सर्वांगीण विकासात पत्रकारांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
नगरपरिषदेच्या प्रस्तावित आणि नियोजित नवीन इमारतीमध्ये स्वतंत्र पत्रकार कक्ष उभारण्यात येणार असून,त्या ठिकाणी पत्रकारांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा नगरपरिषदेचा प्रयत्न राहील, असे आश्वासन नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी दिले.
यावेळी पत्रकार महादेव पाखरे, श्रीकांत बोरावके, दादासाहेब करांडे, विठ्ठल शिंदे यांनी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनकार्याची माहिती उपस्थितांना दिली.
कार्यक्रमास नगरसेवक आदित्य घुंडरे, सोमनाथ कुऱ्हाडे,गोविंद कुऱ्हाडे, सागर कुऱ्हाडे, सुनील घुंडरे, सचिन गिलबिले,दिनेश घुले,सुरेश झोंबाडे,नगरसेविका ऋतुजा घुंडरे, खुशी बोरुंदिया, साक्षी कुऱ्हाडे,सुजाता तापकीर, उज्वला काळे तसेच इतर मान्यवर व पत्रकार बांधव उपस्थित होते.













