‘लोकोत्सव महाराष्ट्राचा’ कार्यक्रमातून पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळेंच्या स्मृतींना उजाळा
![]()
डोंबिवलीच्या पुरस्कार डान्स अकादमीचा आचार्य अत्रे रंगमंदिरात लोकोत्सव; विविध लोककलांचा जागर
डोंबिवली : पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे यांच्या जन्मशताब्दी पूर्ती निमित्त डोंबिवली येथील कथक व लोकनृत्याची नामांकित संस्था पुरस्कार डान्स अकादमी यांच्या वतीने ४ जानेवारी २०२६ रोजी कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात ‘लोकोत्सव महाराष्ट्राचा’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातून लोककलेच्या समृद्ध परंपरेचा जागर करत शाहिरांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमात महाराष्ट्रातील ओवी, जनजागरण करणारा वासुदेव, सोंगी भारुड, कोळी नृत्य, लावणी, गोंधळ, नमन आदी विविध लोककला प्रकारांचे सादरीकरण कलाकारांनी प्रभावीपणे केले. लोककलेच्या या रंगीबेरंगी आविष्काराला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

पद्मश्री शाहीर साबळे यांच्यासोबत अनेक वर्षे कार्य केलेले ज्येष्ठ कलाकार श्री. सुभाष खरोटे, ज्ञानेश्वर ढोरे, मनोहर गोलंबरे आणि शाहीर विवेक ताम्हनकर यांनी आपल्या उपस्थितीने व मार्गदर्शनाने कार्यक्रमाला विशेष उंची दिली.
कलाकारांना आशीर्वाद व शुभेच्छा देण्यासाठी श्रीमती माई साबळे, सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक व लेखक श्री. संतोष पवार तसेच श्री. संजय साबळे उपस्थित होते. माई साबळे यांनी कलाकारांच्या उत्कृष्ट सादरीकरणाचे कौतुक करत, “बाबांची स्मृती जिवंत ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य तुम्ही करत आहात,” अशा शब्दांत सर्वांचे कौतुक केले. संतोष पवार यांनी लोकधारेतील आपल्या आठवणींना उजाळा देत उपस्थितांना भावूक केले.

सर्व कलाकारांचा सन्मान श्री. संतोष पवार व माई साबळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरस्कार डान्स अकादमीच्या संचालिका सौ. सुस्मिता विवेक ताम्हनकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन शाहीर विवेक ताम्हनकर यांनी मानले.

कार्यक्रमाची सांगता पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे यांनी अजरामर केलेल्या महाराष्ट्र गीताने (राज्यगीताने) करण्यात आली. लोककलेच्या माध्यमातून शाहिरांच्या स्मृतींना उजाळा देणारा हा कार्यक्रम उपस्थितांच्या मनावर खोल ठसा उमटवून गेला.

वाईहून मान्यवरांची उपस्थिती –
या कार्यक्रमासाठी वाई येथून पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे यांच्या कार्याचा वारसा जपणाऱ्या शाहीर साबळे प्रतिष्ठानचे सचिव संजय साबळे मुख्य विश्वस्त माई साबळे, श्रीधर जगताप व जितेंद्र बुरटे, तसेच संकल्प माध्यम समूहाचे संपादक अशोक इथापे आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाच्या गौरवात भर पडली असून, शाहीर साबळे यांच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमांना बळ मिळाले.














