Thu, Jan 15, 2026
सातारा जिल्हा

मांढरदेव श्री क्षेत्र काळूबाईदेवीची यात्रा सुरक्षित वातावातावरणात पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कामे करा – जिल्हाधिकारी संतोष पाटील

मांढरदेव श्री क्षेत्र काळूबाईदेवीची यात्रा सुरक्षित वातावातावरणात पार पाडण्यासाठी  सर्व यंत्रणांनी समन्वयाने कामे करा – जिल्हाधिकारी संतोष पाटील
Ashok Ithape
  • PublishedDecember 24, 2025

सातारा दि. 24: मांढरदेव श्री क्षेत्र काळूबाईदेवीची यात्रा 2 जानेवारी ते 4 जानेवारी या कालावधीत होणार आहे. यात्रा शांततेत, उत्साहात व सुरक्षित वातावातावरणात पार पाडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे.  यात्रा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.

मांढरदेवी येथील श्री. काळेश्वरीची यात्रेसंदर्भात आज जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एमटीडीसी हॉल, मांढरदेव येथे बैठक संपन्न झाली. पोलीस अधीक्षक तुषार दोषी, वाईचे प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे, वाईच्या तहसीलदार सोनाली मेटकरी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे त्यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 यात्रेत पशुहत्या होणार नाही याची खबरदारी घ्यावी. या काळात पशुपक्षी बळी प्रतिबंध करण्याकरीता भरारी पथकांची नियुक्ती करावी. ही भरारी पथके वाई व भोर येथून येणाऱ्या मार्गांवर ठेवावी. यात्रा कालावधीत 50 मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करावी. या टॉयलेट मधील टाक्यांमध्ये पाणी संपल्यावर तात्काळ पाणी उपलब्ध करून द्यावे. या टॉयलेटचा किती नागरिकांनी उपयोग केला याची माहिती होण्यासाठी नोंदवही ठेवावी. कोणीही उघड्यावर शौचासाठी जाणार नाही याची दक्षता घेण्यासाठी यासाठी गुड मॉर्निंग पथकाची नियुक्ती करावी.

   भेसळयुक्त पदार्थांची विक्री होणार नाही यासाठी अन्न व औषध विभागाने हॉटेल व अन्नदान करणाऱ्या ठिकाणचे पदार्थांचे नमुने घेऊन त्याची तपासणी करावी. त्या ठिकाणी स्वच्छता बाळगण्यासाठी खाद्यविक्रेत्यांची बैठक घेऊन याबाबत सूचना द्याव्यात, तपासणीसाठी विशेष दक्षता घेऊन भरारी पथके नेमावीत, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिले. यात्रा कालावधीत २४ तास अखंडीत विद्युत पुरवठा राहील याची आवश्यक ती खबरदारी घेवून विद्युत विभागाने मागणीप्रमाणे विद्युत जोडणी द्यावी अवैधरीत्या विद्युत पुरवठा होणार नाही याची खबरदारी घ्यावी.तसेच खाली आलेल्या वीज तारांची दुरुस्ती करावी.

सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्डे भरुन घ्यावेत. रस्त्यावर खड्यांमुळे वाहन बंद पडणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, अपघात प्रवण रस्त्यावरील ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस विभाग यांनी संयुक्तपणे भेट द्यावी व आवश्यक त्या उपाय योजना कराव्यात. यात्रा कालावधीत आरोग्य डॉक्टर व औषध सुविधांबाबत जनजागृती आरोग्य विभागाने करावी. जास्त करुन भाविक हे  भाविक भोर तालुक्यातून येतात. त्यामुळे या तालुक्यातील आरोग्य विभागाकडील ही मनुष्यबळाचा उपयोग करावा. अधिग्रहीत केलेल्या खाजगी हॉस्पीटलमधील बेड व उपचार करणारे डॉक्टर्स राखीव राहतील याची दक्षता घ्यावी. सुसज्ज अॅब्युलन्सही उपलब्ध ठेवावी. यात्रा कालावधीत संपूर्ण वाई तालुक्यात ड्रायडे घोषित करावा. या कालावधीत अवैधरित्या दारूची विक्री होणार नाही याची उत्पादन शुल्क विभागाने दक्षता घ्यावी.

  यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांची दळणवळण व्यवस्था चोखपणे पार पाडण्यासाठी विशेष गाड्यांचे व फेऱ्यांचे नियोजन करावे. घाट रस्ता असल्याने एसटी बसेस बंद पडणार नाहीत अशा बसेस पुरवाव्यात. एखादे वाहन बंद पडल्यास ताबडतोब बाजूला करण्यासाठी क्रेनची व्यवस्था ठेवावी. चांगली वाहने व सक्षम कर्मचारी कार्यरत ठेवावेत. वाहनतळावर भाविकांकरीता किमान मुलभूत सोयी सुविधांची व्यवस्था करावी. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रकाची प्रसिध्दी करावी. कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य पध्दतीने व वेळेत झाले पाहीजे. मोबाईल टॉयलेट पुरेसे उपलब्ध ठेवावेत. यात्रेत परिसरात स्वच्छतेसह शुध्द पिण्याचा पुरवठा करावा. यात्रेसाठी येणाऱ्या खाजगी वाहनांचे पार्कंग व्यवस्था निश्चीत करावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिले. यात्रेनिमित्त विविध विभागांमार्फत कामे सुरू आहेत ही कामे 31 डिसेंबर पर्यंत पूर्ण करावीत. सुरू असलेल्या कामांवर प्रांताधिकारी वाई व तहसीलदार यांनी लक्ष ठेवावे अशाही सूचना जिल्हाधिकारी श्री पाटील यांनी केल्या.

यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी चूक पोलीस बंदोबस्त ठेवणार असल्याचे सांगून यासाठी अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाईल असेही त्यांनी सांगितले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!