Thu, Jan 15, 2026
सातारा जिल्हा

समाजमाध्यमांद्वारे ग्राहकांच्या हक्कांची व अधिकारांची जनजागृती करा – अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने

समाजमाध्यमांद्वारे ग्राहकांच्या हक्कांची व अधिकारांची जनजागृती करा – अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने
Ashok Ithape
  • PublishedDecember 24, 2025
सातारा दि. 24 : नागरिक हा जन्मापासून ग्राहक असतो.  ग्राहकांसाठी असणाऱ्या हक्कांची, अधिकारांची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी विविध समाज माध्यमांचा वापर करुन जनजागृती करावी, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी केले.
सातारा एस.टी. बस स्थानक परिसरात राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी श्री. माने बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्या मनिषा रेपे, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्या रोहिणी जाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, प्रांताधिकारी आशिष बारकुल, तहसीलदार समिर यादव, अन्न सुरक्षा अधिकारी इमरान हवलदार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, नागरिक उपस्थित होते.
विविध विभाग ग्राहकांसाठी पारदर्शक काम करीत आहे, असे सांगून अप्पर जिल्हाधिकारी श्री. माने म्हणाले, ग्राहकाची कोणत्याही प्रकारे फसवणूक झाल्यास तक्रार कोठे करावी, तक्रारीसाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे, तक्रारीचे निर्गती किती दिवसात होते, याची सविस्तर माहिती ग्राहकांना समाज माध्यमातून सहज उपलब्ध करुन दिले जावू शकते. ग्राहकांना उत्तम सेवा मिळण्याचा अधिकार असल्याने यातून त्यांची जनजागृती होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्या श्रीमती रेपे म्हणाल्या, 2019 साली ग्राहकांसाठी नव्याने कायद्यात बदल करण्यात आले आहे. यातील कलम 71 व 72 नुसार जिल्हा ग्राहक मंचाला अधिक अधिकार दिले आहेत. ग्राहकाच्या बाजुने निकाल लागल्यास त्यांची अंमलबजावणी आता 45 दिवसात करता येते. ऑनलाईन वस्तु खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल आहे. साईटवर सेलर्सचे नाव असल्याशिवाय वस्तु खरेदी करुन नका. तसेच बँक फसवणुकीचे प्रकार वाढत आहे बँक फसवणुकीचा प्रकार झाल्यास 24 तासाच्या आत बँकेकडे व पोलीस विभागाच्या सायबर सेलकडे तक्रार करावी लेखी पुराव्यानीशी तक्रार करावी, असे आवाहनही श्रीमती रेपे यांनी केले.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्या श्रीमती जाधव यांनी ग्राहकांना असलेल्या अधिकार व त्यांची कर्तव्यांची माहिती दिली.
प्रत्येक नागरिक हा  ग्राहक असून ग्राहकांची व्याप्ती मोठी आहे. ग्राहकांचे हक्क व कर्तव्य याची जाणीव करुन देण्यासाठी 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो.  ग्राहकांना त्यांचे अधिकार व कायद्याची माहिती व्हावी हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे प्रास्ताविकात जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती राजमाने यांनी सांगितले.
कृष्णाई कला मंच यांनी पथनाट्याद्वारे ग्राहकांना असणारे अधिकार व कर्तव्य याची माहिती दिली. तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या रास्त भाव दुकानदारांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!