Thu, Jan 15, 2026
राजकीय बातमीपत्र सातारा जिल्हा

सातारा जिल्ह्यात भाजपचा झेंडा; नगरपालिका निवडणुकांत बहुमत स्पष्ट

सातारा जिल्ह्यात भाजपचा झेंडा; नगरपालिका निवडणुकांत बहुमत स्पष्ट
Ashok Ithape
  • PublishedDecember 21, 2025

▶ वाई नगराध्यक्षपदाच्या चुरशीच्या लढतीत बीजेपीचे अनिल सावंत विजयी

▶ 2160 मतांनी मिळवला निर्णायक विजय
▶ वाईला मिळाले नवे नगराध्यक्ष
▶ नागरिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण

सातारा, वाई, रहिमतपूर, म्हसवड, मलकापूर येथे भाजप नगराध्यक्ष विजयी; पाचगणीत दोन मतांनी चुरशीचा सामना

सातारा : सातारा जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांच्या निकालात भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व स्पष्टपणे समोर आले आहे. जिल्ह्यातील सातारा, वाई, रहिमतपूर, म्हसवड आणि मलकापूर या प्रमुख नगरपालिकांमध्ये भाजप समर्थित किंवा भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले असून जिल्ह्याच्या राजकारणात भाजपची ताकद अधिक भक्कम झाली आहे.

सातारा नगरपालिकेत सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक अमोल मोहिते यांनी तब्बल ४२ हजार मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे साताऱ्यात भाजपची सत्ता अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे.

वाई नगरपालिकेत भाजपचे उमेदवार अनिल सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रा. डॉ. नितीन कदम यांचा पराभव करत नगराध्यक्षपदावर आपले नाव कोरले. या निकालामुळे वाईतील राजकीय समीकरणे बदलली आहेत.

रहिमतपूर नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील माने यांना मोठा धक्का बसला आहे. विरोधी पक्षनेते निलेश माने यांच्या पत्नी सौ. वैशाली माने यांनी सुनील माने यांच्या पत्नींपेक्षा अवघ्या ५५ मतांनी आघाडी घेत नगराध्यक्षपद खेचून आणले.

दरम्यान, पाचगणी नगरपालिकेत अत्यंत चुरशीचा सामना पाहायला मिळाला. केवळ दोन मतांच्या फरकाने उमेदवार विजयी झाल्याने पराभूत उमेदवाराच्या मागणीवरून फेर मतमोजणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

एकूणच सातारा जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांच्या निकालांनी भाजपचे जिल्ह्यातील राजकीय बळ अधोरेखित झाले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणावर या निकालांचा मोठा प्रभाव पडणार असल्याचे चित्र आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!