Thu, Jan 15, 2026
सामाजिक

वाढदिवसाला मानवतेची भेट; पाटील हॉस्पिटलच्या रक्तदान शिबिरात ७० जणांचे रक्तदान

वाढदिवसाला मानवतेची भेट; पाटील हॉस्पिटलच्या रक्तदान शिबिरात ७० जणांचे रक्तदान
Ashok Ithape
  • PublishedDecember 18, 2025

वाई : “रक्तदान हेच जीवनदान” या उदात्त विचाराला कृतीची जोड देत पाटील हॉस्पिटल, वाई यांच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिर व धनुर्वात प्रतिबंधक लसीकरण उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. पसरणी येथील युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते सचिन महांगडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते स्वप्निलभाई गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. बुधवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी पाटील हॉस्पिटल, पोलीस स्टेशनजवळ, वाई येथे झालेल्या या शिबिरास वाई शहरासह पसरणी परिसर व विविध भागांतून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. इंडियन रेड क्रॉस सोसायटी व बेल एअर ब्लड सेंटर यांच्या सहकार्याने पार पडलेल्या या उपक्रमात एकूण ७० रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजऋण फेडले.

उद्घाटनप्रसंगी बोलताना स्वप्निलभाई गायकवाड यांनी डॉ. अजय पाटील व पाटील हॉस्पिटलतर्फे समाजासाठी सातत्याने राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचे तोंडभरून कौतुक केले. वाई तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागात घेतली जाणारी मोफत वैद्यकीय शिबिरे, गरजू रुग्णांसाठी दिली जाणारी आरोग्यसेवा तसेच आजच्या रक्तदान शिबिरासारखे उपक्रम हे केवळ वैद्यकीय सेवा नसून समाजघडणीचे कार्य असल्याचे त्यांनी नमूद केले. “डॉक्टर जेव्हा उपचारांसोबत माणुसकी जपतात, तेव्हा हॉस्पिटल केवळ इमारत न राहता आशेचे मंदिर बनते. पाटील हॉस्पिटल हे त्या अर्थाने समाजासाठी धडधडणारे हृदय आहे,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

वाई तालुक्यातील नामांकित स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अजय पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून वाई परिसरात रुग्णसेवेत कार्यरत असून, उपचारांसोबत सामाजिक बांधिलकी जपणारे डॉक्टर म्हणून त्यांची ओळख आहे. गरीब व गरजू रुग्णांसाठी मदतीचा हात, ग्रामीण भागात आरोग्याबाबत जनजागृती, आपत्तीच्या काळात मदतकार्य तसेच रक्तदानासारख्या उपक्रमांमधून त्यांनी वैद्यकीय सेवेपलीकडे जाऊन समाजाशी नाते जोडले आहे. त्यामुळे पाटील हॉस्पिटल हे केवळ उपचाराचे ठिकाण न राहता नागरिकांच्या विश्वासाचे केंद्र बनले असल्याची भावना उपस्थितांमधून व्यक्त होत होती.

डॉ. अजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमात रक्तसाठा वाढवण्यासोबतच समाजात करुणा, सहकार्य आणि माणुसकीची भावना अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला. एका थेंबातून अनेकांचे प्राण वाचू शकतात, या भावनेतूनच हा मानवतेचा महायज्ञ यशस्वीपणे पार पडल्याचे चित्र दिसून आले. रक्तदानानंतर प्रत्येक रक्तदात्यास टी-शर्ट व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

या रक्तदान शिबिरासाठी उपस्थित सर्वच मान्यवरांनी डॉ. अजय पाटील व पाटील हॉस्पिटल यांच्या सामाजिक व सेवाभावी उपक्रमांचे मनःपूर्वक कौतुक केले, तसेच या पवित्र उपक्रमाच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करणाऱ्या पसरणीचे युवा उद्योजक सचिन महांगडे यांना शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक जाणिवेचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमास स्वप्निलभाई गायकवाड (नेते, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया), विलास येवले (उपसभापती, बाजार समिती वाई), राजू शिर्के (माजी सरपंच, पसरणी), राजेश शिंदे (माजी पंचायत समिती सदस्य), भगवान महांगडे पाटील (माजी चेअरमन), प्रकाश आप्पा येवले, सी.ए. सागर वाघ, प्रफुल्ल जाधव, युवराज मांढरे, तसेच राष्ट्रीय सेवा दलाचे कार्यकर्ते, सोमनाथ वालेकर, संदीप बाबर, भगवान अर्जुन, सोमनाथ साबळे, सर्व मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, पाटील हॉस्पिटलचा संपूर्ण स्टाफ, बेल एअर ब्लड सेंटरची टीम व खंडाळा फायर ब्रिगेडची टीम यांची या रक्तदान शिबिरास प्रमुख उपस्थिती होती.

एका वाढदिवसाच्या निमित्ताने समाजाला जीवनदान देण्याचा आदर्श ठेवणारा हा उपक्रम वाई तालुक्यासाठी प्रेरणादायी ठरला असून, अशा सामाजिक उपक्रमांतूनच समाजात विश्वास, संवेदना व माणुसकी अधिक बळकट होत असल्याचे चित्र या रक्तदान शिबिरातून स्पष्ट झाले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!