वाईच्या शिवाजी कदम यांना मानद डॉक्टरेट; सामाजिक, शैक्षणिक कार्याचा गौरव
![]()
ग्रामीण संघर्षातून मानद डॉक्टरेटपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
वाई : येथील सामाजिक, शैक्षणिक, क्लिनिकल लॅबोरेटरी तसेच औषध व्यापार क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करणारे सर्वसामान्य व मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व श्री. शिवाजी कदम यांना मानद डॉक्टरेट (Honoris Causa) पदवीने सन्मानित करण्यात आले.
दिल्ली येथील भारत सरकारच्या नीती आयोगाच्या मान्यताप्राप्त सॉक्रेटिस सामाजिक संशोधन विद्यापीठाच्या वतीने आरोग्य, शिक्षण, सामाजिक कार्य, क्लिनिकल लॅबोरेटरी व लॅबोरेटरी संघटना क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.

ग्रामीण भागातून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जीवनप्रवास सुरू करून उच्च शिक्षण, स्वयंरोजगार आणि ‘कमवा व शिका’ या मूल्यांचा आदर्श निर्माण करणाऱ्या श्री. कदम यांच्या कार्याचा गौरव या मानद डॉक्टरेट पदवीद्वारे करण्यात आला आहे.
हा पदवी प्रदान सोहळा दिलासा फाउंडेशनच्या वतीने मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. सदर मानद डॉक्टरेट पदवी डॉ. विजय पंडित (अध्यक्ष, अग्रवाल कॉलेज) व पद्मिनी कृष्णा (सचिव, दिलासा फाउंडेशन) यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी श्रीचंद केसवानी, डॉ. मुकुंद बोधनकर (वरिष्ठ शास्त्रज्ञ, ए.पी.टी. रिसर्च फाउंडेशन, पुणे), डॉ. शशी धरण (कार्पोरेट प्रशिक्षक), श्री. योगेश शर्मा (शास्त्रज्ञ) तसेच डॉ. दीपक खांडेकर (अभिनेते व लेखक) व श्री. कुमार नायर हे मान्यवर उपस्थित होते.
हा सन्मान श्री. शिवाजी कदम यांनी आपल्या पत्नी सौ. पुष्पा कदम, चिरंजीव डॉ. रोहित, डॉ. रिषभ, सून प्रणिता व नातू रिआन यांच्या उपस्थितीत स्वीकारला. यावेळी विद्यापीठ व दिलासा फाउंडेशनच्या वतीने त्यांच्या बहुआयामी कार्याचा गौरव करण्यात आला.
यापूर्वी मिळालेल्या विविध पुरस्कारांबरोबरच या मानद डॉक्टरेट पदवीमुळे समाजासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची नवी ऊर्जा व प्रेरणा मिळाल्याची भावना श्री. शिवाजी कदम यांनी व्यक्त केली.













