ट्रॅव्हल्स बसमध्ये विसरलेली पर्स पोलीस नाईक सुशांत धुमाळ यांच्या प्रयत्नाने महिलेस परत
वाई : भुईज पोलिस स्टेशनमध्ये नेमणुकीस असलेले ट्रॅफिक ड्युटीवरील पोलीस नाईक सुशांत धुमाळ यांच्या तत्परता व प्रामाणिकपणामुळे ट्रॅव्हल्स बसमध्ये विसरलेली पैशांची पर्स एका महिलेस सुखरूप परत मिळाल्याची घटना घडली आहे.
आसरे (ता. वाई) येथील रहिवासी कविता शिवराज सनस या आपल्या मुलींची शाळेची फी भरण्यासाठी वाई येथे ट्रॅव्हल्स बसने प्रवास करत असताना त्यांनी पैशांची पर्स असलेली बॅग बसमध्येच विसरली होती. या पर्समध्ये १३ हजार ५०० रुपये रोख रक्कम, महत्त्वाची कागदपत्रे तसेच कपडे होते.
ही बाब लक्षात येताच पोलीस नाईक सुशांत धुमाळ यांनी तात्काळ हालचाली करत संबंधित ट्रॅव्हल्स बसचा शोध घेतला. एपीआय पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही पर्स शोधून काढण्यात आली व महिलेस समक्ष परत करण्यात आली.
वाई उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनील साळुंखे, भुईज पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. पृथ्वीराज ताटे तसेच पोलीस उपनिरीक्षक पतंगराव पाटील व पोलीस उपनिरीक्षक सुरज शिंदे यांनी पोलीस नाईक सुशांत धुमाळ यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
दरम्यान, ही बॅग मिळवून देण्यासाठी टोलनाका व्यवस्थापनाचे श्री. गांधी साहेब व त्यांचे कर्मचारी श्री. अविनाश फरांदे, राजेंद्र भोसले, मिथुन चौगुले, बिपिन मनोज भिलारे, वैभव किर्दत तसेच भुईज पोलिस स्टेशनचे अमलदार रोहन चव्हाण व अजित पवार यांनी मोलाचे सहकार्य केले.













