पुणे पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन, फर्ग्युसन महाविद्यालयात 13 ते 21 डिसेंबरदरम्यान आयोजन
पुणे पुस्तक महोत्सवासारखे उपक्रम ग्रामीण भागातही पोहोचावेत – केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
पुणे, दिनांक 13 डिसेंबर 2025
पुण्यातील पुस्तक महोत्सवास भेट देणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. यंदाच्या महोत्सवात पहिल्याच दिवशी विक्रमी पुस्तक विक्री झाली. या महोत्सवात भारतीय विचार आणि संस्कृती यांचे मंथन घडत असल्याचे दिसून येते. या माध्यमातून नागरिकांमध्येही वाचनाची आवड निर्माण होत असून भविष्यात अशा प्रकारचे उपक्रम ग्रामीण भागातही पोहोचावेत, असे प्रतिपादन केंद्रीय नागरी विमान वाहतूक तथा सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज केले.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय पुस्तक न्यास यांच्या वतीने पुणे पुस्तक महोत्सवाचे शनिवारी जल्लोषात उद्घाटन झाले, यावेळी श्री. मोहोळ बोलत होते. हा महोत्सव पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय येथे 13 ते 21 डिसेंबरदरम्यान आयोजित करण्यात आले आहे.
उद्घाटनप्रसंगी, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष मिलिंद मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या प्रमुख भाषणात बोलताना केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, पुणे पुस्तक महोत्सवातील आयोजन हे केवळ पुस्तक विक्रीपर्यंत मर्यादित न राहता याठिकाणी विद्वत्तापूर्ण आणि वैचारिक मंथन घडवून आणणाऱ्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात येते. यामुळे, भारतीय विचार, संवाद आणि संस्कृतीचा महोत्सव म्हणून ओळखला जात आहे. याठिकाणी देश विदेशातील विविध भाषेतील पुस्तके उपलब्ध आहेत, याचाच अर्थ पुणे हे साहित्य, कला, संस्कृती याच मानबिंदू असलेले शहर म्हणून ओळख आहे. या महोत्सवाकडे वाचन संस्कृतीला समृद्ध करण्याचे व्यासपीठ म्हणून बघितले जात असून पुणेकरांच्या मनात या महोत्सवाबद्दल आपुलकी निर्माण झाली आहे, असे त्यांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले, अभिजात मराठी भाषासह सर्व भारतीय भाषेचे संवर्धन, नवोदित लेखकांना व्यासपीठ तसेच सर्व वयोगटात वाचन संस्कृती रुजविण्याचे काम या महोत्सवाने केले आहे. पुणे शहर हे ज्ञानाची, विचाराची आणि सांस्कृतिक परंपरेची नगरी असून या परंपरेला साजेसा वाचन महोत्सव पुणेकरांनी मनापासून स्वीकारला आहे, असे मत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पुणे शहर हे पुस्तकांची राजधानी व्हावी, अशी आपल्या सर्वांची मागणी आहे. पुढच्या २०२६ वर्षासाठी पुस्तकांची राजधानी घोषित झाली आहे. त्यामुळे २०२७ मध्ये पुण्याला पुस्तकांची जागतिक राजधानी बनविण्यासाठी पुणेकरांनी पुढील आठ दिवस मोठ्या संख्येने भेट देऊन, पुस्तकांची खरेदी करायची आहे. पुढचा पुणे पुस्तक महोत्सव हा जागतिक पातळीवरील पुस्तक महोत्सव करायचा विचार असून त्यासाठी आपल्याला एकत्रित प्रयत्न करायचे आहे, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.
मिलिंद मराठे म्हणाले, पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने आजपासून पुस्तकांच्या पर्वणीला सुरुवात झाली आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनाला ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांची उपस्थिती लाभणे ही फार चांगली बाब आहे. पुणे शहराची ओळख ही पुस्तकांचे शहर म्हणून होणार आहे.
महोत्सवाविषयी अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की हा महोत्सव चिल्ड्रेन कॉर्नर, पुणे लिटरेचर फेस्टीव्हल, फूड कोर्ट, कल्चरल फेस्टीव्हल अशा विविधतेने नटलेले आहे. पुण्यासोबतच महाराष्ट्रात नागपूर पुस्तक महोत्सव लोकप्रिय होत आहे. या निमित्ताने महाराष्ट्रात दोन पुस्तक महोत्सवांचे आयोजन करण्यात येते. पुस्तक महोत्सवाने वाचन चळवळ समृद्ध करण्यासाठी मोठा वाटा उचलला आहे. सर्वांनी मोठ्या संख्येने पुणे पुस्तक महोत्सवात सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मराठे यांनी केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. काटीकर यांनी आभार मानले.













