Thu, Jan 15, 2026
पर्यटन

महाबळेश्वर परिसरात विज्ञानविश्व उभे करणारा ‘विज्ञानगड पार्क’ नागरिकांसाठी खुला

महाबळेश्वर परिसरात विज्ञानविश्व उभे करणारा ‘विज्ञानगड पार्क’ नागरिकांसाठी खुला
Ashok Ithape
  • PublishedDecember 14, 2025

वाई, दि. १२ डिसेंबर : महाबळेश्वर–तापोळा मार्गावरील कोत्रोषी येथे मराठी उद्योजक श्री. वसंत जोशी (वाई) यांनी साकारलेला विज्ञानगड पार्क हा अद्भुत आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. गेल्या तब्बल २५ वर्षांच्या अथक प्रयत्नांतून उभा राहिलेला हा प्रकल्प नोव्हेंबर २०२५ पासून पर्यटकांसाठी खुला करण्यात आला असून सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.

महाबळेश्वरपासून सुमारे १८ किलोमीटर अंतरावर, डोंगरमाथ्यावर उभारलेल्या या विज्ञानगडमध्ये पाच मजली भव्य इमारत उभी आहे. पर्यटकांना या इमारतीत जाण्यासाठी केबलवर चालणाऱ्या तीन डब्यांच्या ट्रेनद्वारे प्रवास करावा लागतो. या केबल ट्रेनचे तिकीट दर प्रति व्यक्ती ५०० रुपये ठेवण्यात आले आहेत.

इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर १८ मीटर रुंदीचा व ३० मीटर उंचीचा ट्रान्सपरंट, ३६० अंशात फिरणारा डोम उभारण्यात आला आहे. या रिव्हॉल्व्हिंग डोममध्ये सुमारे २०० प्रेक्षक बसू शकतील असे ट्रान्सपरंट एमपी थिएटर असून येथून कोयना बॅकवॉटर, त्रिवेणी संगम, प्रतापगड, मधुबनगड, महाबळेश्वरचे विविध पॉइंट्स, तापोळा–खेड मार्गावरील पूल, पवनचक्क्या, सोलर पॅनल्स आणि सुनामी डॅमचे दर्शन घडते. या सर्व स्थळांची सविस्तर माहिती प्रशिक्षित गाईडमार्फत दिली जाते.

चौथ्या मजल्यावर ३६० अंशात फिरणारे रेस्टॉरंट असून येथे एकावेळी सुमारे २०० पर्यटकांची बसण्याची व्यवस्था आहे. व्हेज व नॉनव्हेज जेवण प्रति व्यक्ती ६०० रुपये दराने उपलब्ध असून त्यात स्टार्टर, वेलकम ड्रिंक, भाजी, चिकन मसाला, भात, चपाती, रोटी व आईस्क्रीमचा समावेश आहे. सह्याद्रीच्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत जेवणाचा वेगळाच अनुभव येथे मिळतो.

खालच्या मजल्यावर ऍम्पी थिएटरमध्ये पृथ्वीची उत्पत्ती, पुढील मजल्यावर भूकंपाचे प्रात्यक्षिक, तर त्याखालील मजल्यावर धरणात निर्माण होणाऱ्या सुनामीचे प्रत्यक्ष दर्शन घडवण्यात येते. तसेच दोन पातींच्या पवनचक्क्या व सोलर पॅनलच्या माध्यमातून आवश्यक वीज निर्मिती केली जाते. जंगल ट्रेक मार्गावर क्षेपणास्त्रांच्या प्रतिकृती उभारून त्यांची कार्यपद्धती समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पाच मजली इमारतीत वर-खाली जाण्यासाठी आधुनिक लिफ्टची व्यवस्था करण्यात आली आहे.

१८ एकर क्षेत्रफळावर उभारलेला हा संपूर्ण प्रकल्प श्री. वसंत जोशी यांच्या खासगी मालकीचा असून यासाठी अमेरिकन तज्ज्ञांचे सहकार्य घेण्यात आले आहे. विज्ञान, निसर्ग आणि पर्यटन यांचे अनोखे मिश्रण असलेला विज्ञानगड पार्क महाबळेश्वर परिसरातील पर्यटनाला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!