Thu, Jan 15, 2026
आरोग्य

जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाटीबाबत सर्व रुग्णालयांची तपासणी करा – जिल्हाधिकारी संतोष पाटील

जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाटीबाबत सर्व रुग्णालयांची तपासणी करा – जिल्हाधिकारी संतोष पाटील
Ashok Ithape
  • PublishedDecember 10, 2025

सातारा, दि.10 : सर्व रुग्णालयांनी जैव वैद्यकीय कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे, त्यासाठी नियुक्त केलेल्या संस्थांच्या सेवा वापरणे बंधनकारक आहे. तथापि काही ठिकाणी असा कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सर्व रुग्णालयांची तपासणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात जैव वैद्यकीय कचरा सल्लागार समिती, पर्यावरण संनियत्रण समिती व घनकचरा व्यवस्थापन देखरेख समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या. निना बेदरकर, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अमोल सातपुते, नगर प्रशासन अधिकारी अभिजीत बापट, क्षेत्र अधिकारी अर्चना जगदाळे आदी उपस्थित होते.

जैव वैद्यकीय कचरा नोंदणीकृत संस्थेमार्फत शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्याबाबत जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांची लवकरात लवकर बैठक घ्यावी, अशा सूचना देवून जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, जी रुग्णालये जैव वैद्यकीय कचऱ्याची नोंदणीकृत संस्थेमार्फत विल्हेवाट लावत नाहीत अशांवर कारवाई करावी. तसेच महिलांची प्रसुती करणारे हॉस्पीटल व नर्सिंग क्लिनीक यांच्यावरही लक्ष केंद्रीत करावे. या समितीची बैठक प्रत्येक तीन महिन्यांनी घेतली जाईल याबाबत काटेकोर दक्षता घ्यावी. पुढील बैठकीत तीन महिन्यात केलेल्या कामकाजाचा आढावा द्यावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केल्या.
घनकचरा व्यवस्थापनाचा आढावा घेताना जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, ज्या नगर पालिकांच्या घनकचरा व सांडपाणी प्रकल्पाला मंजुरी घेतली नाही त्यांनी तात्काळ मंजुरी घ्यावी. तसेच ज्या नगर पालिकांना मंजुरी मिळाली आहे अशा नगर पालिकांनी हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. ग्रामीण भागात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांची कामे झाली आहेत यातील किती कार्यान्वीत झाली याचीही माहिती पुढील बैठकीत देण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केल्या.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!