शिवथर एसबीआय एटीएम फोडीचा थरारक उलगडाला; १२ तासांत आंतरराज्यीय टोळी जेरबंद
![]()
मध्यप्रदेशात नाकाबंदीत अटक, ११.९९ लाखांची रक्कम व क्रेटा कार जप्त; सातारा पोलिसांची जलद कारवाई
सातारा : शिवथर (ता. जि. सातारा) येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून गॅस कटरच्या सहाय्याने फोडून तब्बल १२ लाख ६ हजार रुपयांची रोख रक्कम चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासांत मध्यप्रदेशातून जेरबंद केले. या धडाकेबाज कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
दि. ६ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे २.०५ ते २.२५ दरम्यान शिवथर येथील एसबीआय एटीएम फोडून चोरट्यांनी १२,०६,००० रुपये रोख रक्कम लंपास केली होती. तसेच एटीएममधील एसी जाळून सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान केले होते. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांची हुंडाई क्रेटा कार निष्पन्न झाली. पुढील तपासातून आरोपी पुणे–औरंगाबाद–धुळे मार्गे मध्यप्रदेशकडे पळाल्याचे स्पष्ट झाले.
पोलीस अधीक्षकांनी तात्काळ धार व इंदौर जिल्हा पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून नाकाबंदीचे आदेश दिले. पिथमपुर (जि. धार, म.प्र.) हद्दीत नाकाबंदी दरम्यान संशयित वाहन पकडण्यात आले. साताऱ्याच्या तपास पथकाने तब्बल ७०० कि.मी.चा प्रवास करून सात तासांत पिथमपुर येथे दाखल होत आरोपी ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी :
१) हासमदिन अल्लाबचाए खान (वय ५४, राजस्थान)
२) सलीम मुल्ली इस्ताक (वय २५, हरियाणा)
३) राहूल रफिक (वय ३०, हरियाणा)
आरोपींकडून ११ लाख ९९ हजार रुपये रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली क्रेटा कार व एटीएम फोडण्यासाठीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. हे तिघेही आरोपी हरियाणा व राजस्थानमधील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर गुजरात, आसाम, राजस्थान व कर्नाटक राज्यांत एटीएम फोडीचे गुन्हे दाखल आहेत.
न्यायालयाने आरोपींना दि. १० डिसेंबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे करीत आहेत. या यशस्वी कारवाईबद्दल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांनी विशेष अभिनंदन केले आहे.













