वाईच्या मेजर डॉ. समीर पवार यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट एनसीसी अधिकारी पुरस्कार
![]()
किसन वीर महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा; मुंबई येथे गौरव सोहळा
वाई, प्रतिनिधी : जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालय, वाई येथील एनसीसी अधिकारी मेजर डॉक्टर समीर पवार यांना महाराष्ट्र राज्य एनसीसी अधिकारी वेल्फेअर बोर्ड यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यस्तरीय उत्कृष्ट एनसीसी अधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एनसीसी अधिकाऱ्यांचा विशेष पुरस्काराने मुंबई येथे सन्मान करण्यात येणार आहे. त्यामध्ये मेजर डॉ. समीर पवार यांचा गौरव होणार आहे.
मेजर डॉ. समीर पवार गेल्या वीस वर्षांपासून 22 महाराष्ट्र एनसीसी बटालियन, सातारा यांच्या अंतर्गत एनसीसी अधिकारी व महाविद्यालयाचे क्रीडा संचालक म्हणून कार्यरत आहेत. शिस्त, देशभक्ती, नेतृत्वगुण आणि सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी राबविलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांचा आजवर अनेक वेळा गौरव झाला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत वर्ष 2021 मध्ये त्यांना राष्ट्रीय स्तरावर डायरेक्टर जनरल ऑफ एनसीसी कमंडेशन कार्ड प्रदान करण्यात आले होते.
राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय मदनदादा भोसले, उपाध्यक्ष मा. शंकरराव गाढवे, सचिव मा. डॉ. जयवंतराव चौधरी, सहसचिव मा. प्रा. नारायणराव चौधरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य प्रा. डॉ. विनोद वीर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
तसेच 22 महाराष्ट्र एनसीसी बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल एम. ए. राजमणियार (सेना मेडल), ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर कर्नल आनंद, सुभेदार मेजर तानाजी भिसे, सुभेदार संभाजी शिंदे, सुभेदार दादा आरगडे, हवालदार नारायण गोळे व इतर स्टाफ यांनीही त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. मेजर डॉ. समीर पवार यांच्या या यशामुळे किसन वीर महाविद्यालय व वाई तालुक्याचा नावलौकिक राज्यपातळीवर वाढला आहे.













