भद्रेश्वर पुलानजीक ड्रेनेजच्या पाण्यामुळे अपघातांची मालिका
![]()
यशवंतनगर ग्रामपंचायतीकडे तात्काळ उपाय योजना करण्याची मागणी
वाई l प्रतिनिधी : वाई तालुक्यातील यशवंतनगर ग्रामपंचायत हद्दीतील वाई–सुरूर पुणे रस्त्यावर, भद्रेश्वर पुलाच्या शेजारी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून त्या ठिकाणी सोसायटींचे ड्रेनेज पाणी थेट रस्त्यावर वाहू लागल्यामुळे दररोज पाच ते सहा दुचाकी अपघात होत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. दरम्यान, यावर तत्काळ उपाय योजना करावी अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे.
वाई शहर हे तालुक्याचे ठिकाण आहे. तसेच पर्यटन स्थळ आहे. येथे पुण्या मुंबईहुन येणाऱ्यांची आणि जाणाऱ्यांची मोठी संख्या आहे. वाई ते पुणे जाणाऱ्या सुरुर रस्त्यावर भद्रेश्वर पुलानजीक गटर्सचे पाणी रस्त्यावर कित्येक दिवसापासून येत आहे. त्यामुळे रोजच्या प्रवासात ओल्या आणि घसरड्या रस्त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. विशेषत: सायंकाळच्या वेळी पाणी साचल्यामुळे रस्ता अधिक धोकादायक बनत असल्याची तक्रार नागरिकांनी व्यक्त केली आहे. स्थानिक रहिवासी म्हणतात की, ग्रामपंचायतने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन ड्रेनेज लाईनमधून रस्त्यावर येणारे पाणी थांबविण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात, अन्यथा मोठ्या दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागरिकांनी यशवंतनगर ग्रामपंचायतीकडे त्वरित उपाय योजना करण्याची मागणी करत प्रशासनाने सहकार्य करून रस्त्यावरील पाणीप्रवाह रोखावा, अशी जोरदार विनंती केली आहे. या समस्येमुळे स्थानिकांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून तातडीच्या उपाययोजनेची गरज अधोरेखित होत आहे. दररोज अपघात होत असून अनेक जण यामुळे जखमी झाले आहेत.













