नारायणपूर येथे दत्तजयंतीदिनी धार्मिक कार्यक्रमादरम्यान अनिल पंडीत यांचे आकस्मिक निधन
वाई, दि. ४ : नारायणपूरचे आण्णा महाराज यांचे शिष्य व वाई येथील परटाचापार गणेशोत्सव मंडळाचे क्रियाशील कार्यकर्ते अनिल ज्ञानेश्वर ऊर्फ बापु पंडीत (वय ६५) यांचे दत्तजयंतीनिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले. या घटनेमुळे नारायणपूरसह वाई परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अनिल पंडीत हे आण्णा महाराजांचे निष्ठावंत शिष्य होते. ते मधुमेह, किडनी स्टोन यांसारख्या आजारांवर झाडपाल्याची औषधे देऊन अनेकांना उपचार करत होते. त्यांच्या सामाजिक व धार्मिक कार्यामुळे परिसरात त्यांचा मोठा परिचय होता.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या अकाली जाण्याने परिसरातील सामाजिक, धार्मिक व गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे. अनेक नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.













