रामचंद्र काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शफिकभाई शेख यांच्या हस्ते सन्मान
सातारा / प्रतिनिधी : राज्य परिवहन सातारा विभागातील लेखाकार रामचंद्र भिवाजी काळे यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आल्याबद्दल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे त्यांचा नुकताच अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शफिकभाई शेख यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.
रामचंद्र काळे हे सातारा एसटी आगार व विभागात लेखाकार म्हणून कार्यरत असून त्या बरोबरीनेच नियुक्त कर्तव्य प्रामाणिकपणे बजावताना त्यांनी काव्य व कथालेखन, संगीत, गायन, वाचन आदी क्षेत्रातही अभिरुची जपले आहे. नुकताच त्यांचा ‘स्मृतींचे पिंपळपान..’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे.
विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य एडी फाउंडेशन यांच्यावतीने नुकताच त्यांना भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार आणि राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र व जागृत नागरिक सेवा संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय विश्वकर्मा गुणवंत कामगार भूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे.
या पुरस्काराबद्दल शफिकभाई शेख यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस भवनात श्री. काळे यांचा सत्कार करण्यात आला. श्री. काळे यांची विविध क्षेत्रातील अभिरुची आणि कामगिरी आदर्शवत आहे. विविध शैक्षणिक पदव्यांच्या माध्यमातून त्यांनी उत्तम शैक्षणिक अर्हता वाढवली आहे. त्यांचे भवितव्य उज्वल आहे, अशा शब्दात श्री. शेख यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.
या सत्कार प्रसंगी पत्रकार व प्रकाशक जयंत लंगडे, सामाजिक कार्यकर्ते तरबेद शेख, अब्दुल रहमान शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो कॅप्शन : सातारा : रामचंद्र काळे यांचा सत्कार करताना शफिकभाई शेख, त्यावेळी विविध मान्यवर













