वाई नगरपरिषद निवडणूक : विक्रमी ७२.९८ टक्के मतदान, २३,१८२ मतदारांचा सहभाग; किरकोळ वादावादी, पण प्रक्रिया शांततेत
- ३४ केंद्रांवर सकाळपासून मतदान
- किरकोळ वाद
- मशीन बिघाड
- नगराध्यक्षपदासाठी ४ तर नगरसेवकपदासाठी ६१ उमेदवार रिंगणात
- सत्ता कोणाची हे ठरणार २१ डिसेंबरला
- निकालाची उत्कंठा शिगेला!
वाई | प्रतिनिधी : वाई नगरपरिषदेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज पार पडलेल्या मतदान प्रक्रियेला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नगराध्यक्ष पदासाठी ४ उमेदवार आणि ११ प्रभागांतील २२ नगरसेवक पदांसाठी तब्बल ६१ उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे संपूर्ण शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.
सकाळी ७.३० वाजता शहरातील एकूण ३४ मतदान केंद्रांवर मतदानास सुरुवात झाली. सकाळच्या गारठ्यामुळे सुरुवातीला मतदानाची गती काहीशी मंदावली होती. मात्र, दुपारनंतर सर्व वयोगटांतील मतदार मोठ्या संख्येने मतदान केंद्रांकडे येऊ लागल्याने मतदानाला वेग आला. सायंकाळी ५.३० नंतरही अनेक केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून येत होत्या.
- किरकोळ वाद, पण परिस्थिती नियंत्रणात
प्रभाग क्र. ८ मधील मतदान केंद्राबाहेर दोन उमेदवारांच्या समर्थकांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. काही काळ तणाव निर्माण झाला असला, तरी पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी घटनास्थळी तात्काळ दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. याशिवाय शहरातील आणखी दोन ठिकाणी किरकोळ वादावादीचे प्रकार घडले. मात्र, कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.
- तीन मतदान केंद्रांवर यंत्र बिघाड
नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक ८, ५ तसेच सेंट थॉमस मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने काही काळ मतदान थांबवावे लागले. मात्र, तांत्रिक पथकाने तातडीने दुरुस्ती केल्यानंतर मतदान पुन्हा सुरळीत सुरू झाले.
- नेत्यांच्या उपस्थितीमुळे वातावरण अधिक तापले
नगरपालिकेची निवडणूक असल्याने विविध पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी दिवसभर मतदान केंद्रांना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, माजी आमदार मदन भोसले, खासदार नितीन पाटील, डॉ. नितीन सावंत, सुरभी भोसले, दीपक ननावरे, प्रतापराव पवार, यशराज भोसले यांच्यासह सर्व पक्षांचे स्थानिक पदाधिकारी मतदान केंद्रांवर फिरताना दिसले.
- ७२.९८ टक्के मतदानाची नोंद
एकूण ३१ हजार ७६३ मतदारांपैकी २३ हजार १८२ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ११ हजार ६४६ पुरुष आणि ११ हजार ५३६ महिला मतदारांचा समावेश असून पुरुष व महिला मतदारांनी समसमान सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे अंतिम मतदानाची टक्केवारी ७२.९८ टक्के इतकी नोंदवण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मेटकरी यांनी दिली.
- निकाल २१ डिसेंबरला जाहीर होणार
दरम्यान, राज्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी मतमोजणी २१ डिसेंबर २०२५ रोजी घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. आज राज्यातील २६४ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. उद्या ०३ डिसेंबर २०२५ रोजी निकाल जाहीर होणार होता. मात्र, आता न्यायालयाच्या आदेशानुसार निकाल २१ डिसेंबर रोजी घोषित होणार आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांचे लक्ष आता निकालाकडे लागले असून त्यांचे जीव टांगणीला लागल्याचे चित्र आहे.
एकूणच, किरकोळ वाद, काही तांत्रिक अडचणी वगळता वाई नगरपरिषदेची निवडणूक शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडली.
- प्रभाग निहाय एकूण मतदान, झालेले मतदान व टक्केवारी
प्रभाग १: एकूण मतदान २८५७, झालेले मतदान २१२५ (७४.३७%),
प्रभाग २: एकूण मतदान २७७९, झालेले मतदान २२०४ (७९.३३% सर्वाधिक),
प्रभाग ३: एकूण मतदान ३२६८, झालेले मतदान २४४३ (७४.७६%).
प्रभाग ४: एकूण मतदान २४५२. झालेले मतदान १८४२. (७५.०८%),
प्रभाग ५: एकूण मतदान २७२८. झालेले मतदान १८६१. (६८.२०%),
प्रभाग ६: एकूण मतदान ३११०, झालेले मतदान २०८१. (६६.९०%),
प्रभाग ७: एकूण मतदान २४८०, झालेले मतदान १७३९, (७०.२०%).
प्रभाग ८: एकूण मतदान २८०९, झालेले मतदान २१५०० (७६.५२%),
प्रभाग ९: एकूण मतदान २७६६. झालेले मतदान २१५३. (७७.८५%),
प्रभाग १० : एकूण मतदान २५६६. झालेले मतदान १६८९, (६६.३८% किमान),
प्रभाग ११: एकूण मतदान ३९४८. झालेले मतदान २८९५, (७३.२५%)













