Thu, Jan 15, 2026
राजकीय बातमीपत्र

वॉर्ड क्रमांक ४ मधील नागरिकांनी मांडल्या समस्या; मेमन आणि कासुर्डे उमेदवारांनी घेतला पुढाकार

वॉर्ड क्रमांक ४ मधील नागरिकांनी मांडल्या समस्या; मेमन आणि कासुर्डे उमेदवारांनी घेतला पुढाकार
Ashok Ithape
  • PublishedNovember 20, 2025

निवडणूक वातावरणात नागरिकांच्या मूलभूत अडचणींवर थेट पाहणी; स्वच्छता, सुरक्षितता आणि सुविधांच्या सुधारणेचं आश्वासक नेतृत्व

विशेष प्रतिनिधी : सचिन ननावरे 

पाचगणी : पाचगणी नगरपरिषद निवडणुकीत वॉर्ड क्रमांक ४ मधील नागरिकांनी मांडलेल्या समस्यांवर उमेदवार परवीन फिरोज मेमन (वॉर्ड ४-अ) आणि शेखर कासुर्डे (वॉर्ड ४-ब) यांनी गेल्या काही दिवसांपासून प्रत्यक्ष पाहणी करत गंभीर अभ्यास केला आहे. उघडी गटारे, खड्डेमय रस्ते, तसेच विस्कळीत स्वच्छता व्यवस्था आणि दुर्लक्षित मूलभूत सुविधा.या सर्व बाबी दोन्ही उमेदवारांनी नागरिकांकडून थेट ऐकून घेतल्या आणि मुद्देसूद नोंदी केल्या.

वॉर्ड ४(अ) मधून उमेदवारी असलेल्या दोन कार्यकाळांच्या अनुभवी नगरसेविका परवीन मेमन यांनी अनेक ठिकाणी अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त गटारे, खड्डेमय रस्ते आणि स्वच्छतेबाबतच्या तक्रारींचा सखोल अभ्यास केला. त्या म्हणतात, “समस्या दिसल्या म्हणून नाही, त्यावर उपाय करण्याची जबाबदारी मानून मी मैदानात उतरले आहे. स्वच्छता, सुरक्षितता आणि संवेदनशील प्रशासन हीच माझी प्रामाणिक बांधिलकी आहे.”

त्याचप्रमाणे, वॉर्ड ४(ब)चे माजी नगरसेवक शेखर कासुर्डे (दादा) यांनीही नागरिकांच्या अडचणींचा प्रत्यक्ष अनुभव घेत रस्ते, गटारे आणि मूलभूत सुविधांच्या बिघाडाची तपशीलवार पाहणी केली. कासुर्डे स्पष्टपणे म्हणाले,“शहराच्या मूलभूत गरजांवर काम झालं, तरच विकासाची खरी पायाभरणी मजबूत होते. पाचगणी अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि सक्षम करणे ही माझी जबाबदारी आहे.”
दोन्ही उमेदवारांच्या सर्वेक्षण दौऱ्यामुळे नागरिकांमध्ये सकारात्मकता निर्माण झाली असून, समस्यांकडे गांभीर्याने पाहून उपाययोजनांची प्रक्रिया सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

उघड्या गटाऱ्यांचे निराकरण, रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छता व्यवस्थेचे अद्ययावत नियोजन आणि मूलभूत सुविधांची सुधारणा..या सर्व उपाययोजना केवळ स्थानिक जीवनमान सुधारण्यासाठीच नव्हे, तर पाचगणीतील पर्यटनाला बळकटी देण्यासाठीही अत्यंत महत्त्वाच्या ठरतील, असे दोन्ही उमेदवारांनी सांगितले. या मूलभूत सुधारणांमुळे पाचगणीत येणाऱ्या पर्यटकांचा अनुभव अधिक सुखकर बनेल, वाढत्या पर्यटनासह स्थानिक व्यवसायांना मोठी चालना मिळेल, हॉटेल्स, दुकाने, टॅक्सी, स्थानिक मार्गदर्शक आणि पर्यटनाधारित सेवांना नवीन संधी निर्माण होतील,तसेच युवकांना जास्त रोजगार उपलब्ध होतील,आणि संपूर्ण परिसराची अर्थव्यवस्था अधिक सक्षम होईल.

स्थानिक नागरिकांच्या अडचणी सोडविण्याच्या या दोन्ही उमेदवारांच्या पुढाकारामुळे पाचगणीसाठी एक नवीन, स्वच्छ, सुरक्षित आणि प्रगतिशील दिशा मिळण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!