वाई तालुक्याची नाविन्यपूर्ण झेप : स्वच्छता, शाश्वतता आणि विकासाचा नवा आदर्श!
![]()
99 ग्रामपंचायतींत प्लास्टिकबंदी, स्वच्छता मोहिमा आणि घरकुल पूर्णता अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्याकडून उपक्रमांचे कौतुक
वाई, दि. 19 नोव्हेंबर :
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान व माझी वसुंधरा अभियानाच्या धर्तीवर, सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) प्रज्ञा माने यांच्या मार्गदर्शनाखाली वाई तालुका प्रशासन सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असून ग्रामविकासात वाई तालुका राज्यभरात आदर्श ठरत आहे.
तालुक्याचे पाणीदार गटविकास अधिकारी म्हणून परिचित असणारे विजयकुमार परीट यांच्या पुढाकारातून पाणी व स्वच्छता विषयक विविध अभियानांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून भरीव कामगिरी करत वाई स्वच्छता चषक स्पर्धा, एक दिवस घरकुल व स्वच्छतेसाठी, माझे गाव, माझी जबाबदारी आणि एक तास स्वच्छतेसाठी असे उपक्रम उत्साहात राबविले जात आहेत.

दि. 18 नोव्हेंबर 2025 रोजी तालुक्यातील 99 ग्रामपंचायतींमध्ये प्लास्टिक बंदी मोहीम आणि मंजूर घरकुल पूर्णता अभियान राबविण्यात आले. यासाठी तालुक्यातील सर्व खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांची गावनिहाय संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. मोहिमेअंतर्गत सर्व ग्रामस्थांनी नशामुक्त भारत अभियानांतर्गत व्यसनमुक्तीची शपथ घेतली.
ग्रामपंचायत हद्दीतील सर्व दुकानदारांना प्लास्टिकबंदीबाबत नोटिसा देण्यात आल्या असून प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली. तसेच गावातील रस्त्याच्या कडेला निर्माण झालेल्या ब्लॅक स्पॉट क्षेत्रांची स्वच्छता करून दंडात्मक कारवाईची सूचना देणारे फलक बसविण्यात आले. श्रमदानातून गोळा झालेला प्लास्टिक कचरा भंगार विक्रेत्यांना विक्री करून पर्यावरणपूरक उपक्रम अधिक सक्षम करण्यात आला.
लाभार्थ्यांना मंजूर घरकुलांच्या भूमीपूजनापासून पाया खुदाईपर्यंतची प्रक्रिया गतीमान करण्यात आली असून अंतिम टप्प्यातील घरकुल पूर्ण करून शेवटचा हप्ता वितरणाची मोहीमही प्रभावीपणे पार पडली. या उपक्रमात तालुक्यातील सर्व सरपंच, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, युवक व ग्रामस्थ यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.
वाई तालुक्यातील या उपक्रमांची सर्वत्र चर्चा होत असून राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा. मकरंद (आबा) पाटील यांनीही या उपक्रमांचे कौतुक करीत तालुका प्रशासनाचे अभिनंदन केले आहे.













