Thu, Jan 15, 2026
राजकीय बातमीपत्र

वाई नगरपालिकेच्या निवडणुकीने तापले राजकीय वातावरण

वाई नगरपालिकेच्या निवडणुकीने तापले राजकीय वातावरण
Ashok Ithape
  • PublishedNovember 17, 2025

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; नगराध्यक्षपदासाठी चुरस वाढली

संजीव वरे, विशेष प्रतिनिधी, वाई

वाई : विलंबानंतर अखेर काही दिवसांवर आलेल्या वाई नगरपालिकेच्या निवडणुकीने कृष्णाकाठचे राजकीय वातावरण तापले आहे. नगराध्यक्षपद खुले असल्याने अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी करत असून, आगामी लढत चुरशीची ठरण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.

मागील निवडणुकीत नगराध्यक्षपदासह काही जागा वगळता, राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व कायम राहिले होते. तथापि, गेल्या काही वर्षांत स्थानिक प्रश्नांवरून निर्माण झालेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर आणि राजकीय समीकरणांतील बदलामुळे येणारी निवडणूक अधिक रंगतदार ठरणार आहे.

यात माजी नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या भाजप प्रवेशाने निवडणुकीचे चित्र पूर्णपणे बदलले आहे. एकतर्फी वाटणाऱ्या लढतीला आता नवीन कलाटणी मिळाली असून भाजपला स्थानिक पातळीवर बळकटी प्राप्त झाली आहे.

या निवडणुकीत भाजपचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले व जयकुमार गोरे, तसेच माजी आमदार मदनदादा भोसले सक्रिय झाले आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या बाजूने मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील व खासदार नितीन काका पाटील हे रणनिती आखताना दिसत आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या प्रतिष्ठेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर, आतापर्यंत सोबत राहिलेल्या मित्रपक्षांमध्येच नगराध्यक्षपदासाठी राजकीय कुस्ती रंगणार का, की काही नवीन चेहरे मैदानात उतरतील, याची उत्सुकता वाढली आहे.

दरम्यान, शहरातील पार्किंगची समस्या, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी नदीत मिसळण्यामुळे वाढलेले प्रदूषण, तसेच शहराच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात येत असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याचे काम — अशी अनेक प्रश्न प्रलंबित असून, हेच मुद्दे येणाऱ्या निवडणुकीत मतदारांच्या निर्णयाला आकार देणार आहेत.

वाई नगरीचा मतदार सुज्ञ असून योग्यतेचा निर्णय मतदान पेटीतून नोंदवणारच. त्यामुळे नगराध्यक्षपद आणि सत्तेची धुरा कोणाकडे जाणार, हे काही दिवसांत स्पष्ट होणार असून, सर्वांचे लक्ष आता निवडणुकीवर केंद्रित झाले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!