Thu, Jan 15, 2026
राजकीय बातमीपत्र

वाईत नगराध्यक्षपदासाठी ९ दिग्गज आमने-सामने

वाईत नगराध्यक्षपदासाठी ९ दिग्गज आमने-सामने
Ashok Ithape
  • PublishedNovember 17, 2025

अखेरच्या दिवशी पक्षांतर्गत बंडखोरीचे संकेत; रेखा जाधव बिनविरोध तर ११ प्रभागांमधील २४ जागांसाठी तब्बल ११४ अर्ज

वाई / प्रतिनिधी

वाई नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी तब्बल ९ उमेदवार तर नगरसेवकपदासाठी १०५ अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीची रंगत चांगलीच वाढली आहे. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी तब्बल ९६ अर्ज दाखल झाल्याने नगरपालिका कार्यालयात गोंधळ, गर्दी आणि शक्तीप्रदर्शनाचे चित्र पाहायला मिळाले.

प्रभाग क्र. ९ ‘अ’ मध्ये मकरंद पाटील गटाच्या रेखा कांताराम जाधव यांची नगरसेविका म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. एबी फॉर्म शेवटच्या १५ मिनिटांत वाटण्यात आल्याने अनेक इच्छुकांना प्रतीक्षेत रहावे लागले, तर काहींच्या हातात निराशा पडली. ११ प्रभागांतील २४ जागांसाठी एकूण ११४ अर्ज दाखल झाले आहेत.

नगराध्यक्षपदासाठी ९ उमेदवारांची लढत

वाईच्या राजकारणात प्रतिष्ठेचा मानला जाणारा नगराध्यक्षपदाचा संघर्ष यंदा अधिकच चुरशीचा ठरणार आहे. प्रमुख उमेदवारांमध्ये —

अनिल सावंत (भाजप) – डबल अर्ज भरल्याने एकूण उमेदवारांची संख्या ९ वर

डॉ. नितीन कदम (राष्ट्रवादी – अजित पवार गट)

प्रवीण शिंदे (शिवसेना – शिंदे गट)

योगीराज फाळके (अपक्ष, शिंदे गटाचे समर्थक)

तेजपाल वाघ (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट)

प्रदीप जायगुडे (राष्ट्रीय काँग्रेस)

विजय ढेकाणे (अपक्ष)

दीपक जाधव (अपक्ष)

या दिग्गजांनी उमेदवारी दाखल केल्याने निवडणुकीचे समीकरण अधिकच गुंतागुंतीचे होणार आहे. पक्षाकडून एबी फॉर्म न मिळाल्याने अनेकांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला असून बंडखोरी वाढण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

अखेरच्या दिवसाच्या गडबडीत ऑनलाइन व समक्ष अर्ज प्रक्रियेत कर्मचार्‍यांवर प्रचंड ताण पडला. नगरपालिका परिसरात अक्षरशः जत्रेसारखे वातावरण निर्माण झाले होते.

तेजपाल वाघ यांनी पूर्वी काँग्रेसमध्ये सक्रिय राहून आता ‘तुतारी’ चिन्हावर शरद पवार गटाकडून अर्ज दाखल केला आहे.

राष्ट्रीय काँग्रेसकडून प्रदीप मारुती जायगुडे, तर शिवसेना (शिंदे गट)कडून प्रवीण दिनकर शिंदे या निष्ठावान कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाली आहे.

अर्जांची छाननी उद्या सकाळी ११ वाजता होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मिटकरी यांनी दिली.

वाई नगरपरिषद निवडणुकीत यंदाची लढत अत्यंत रोमहर्षक ठरणार असून रिंगणातील ९ नगराध्यक्षपदाचे उमेदवार आगामी राजकीय वातावरणाला अधिक रंगत आणणार आहेत.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!